रत्नागिरी- रिफायनरी सर्वेक्षणावरून पोलीस आणि आंदोलकामध्ये जोरदार राडा झाला आहे. सर्वेक्षण बंद पाडण्यासाठी घटनास्थळी बारसू येथे आंदोलक पोहोचले. यावेळी पोलिसांनी अडविल्याने आंदोलक आक्रमक झाले होते. यावेळी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत. तसेच आंदोलकांवर लाठीचार्ज केला आहे. खासदार व ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत बारसू येथे आंदोलकांना भेटण्यासाठी जात असताना पोलीस प्रशासनाने त्यांना प्रवेश नाकारला होता. मात्र, राऊत हे रस्त्यावरच बसल्यानंतर अखेर पोलीस प्रशासनाने त्यांना आत जाण्याची परवानगी दिली.
मुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिक्रिया - बारसू भागात सध्या शांतता आहे. आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला नाही. राजकीय भूमिकेतून विरोधक या प्रकल्पाचे राजकारण करत असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनीच ही जागा सुचवली होती. तसेच याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी पत्र लिहिले होते. मात्र, मुख्यमंत्री पद गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राजकीय सुडापोटी भूमिका बदलल्याचा आरोप मुख्यमंत्री शिंदे यांनी केला आहे.
खासदार विनायक राऊत पोलिसांच्या ताब्यात - उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांना बारसू गावात शुक्रवारी पोलिसांनी ताब्यात घेतले, राऊत हे तेथील प्रस्तावित तेल शुद्धीकरण प्रकल्पाला विरोध करणाऱ्या स्थानिक लोकांच्या भेटीसाठी गेले होते. त्यामुळे त्या ठिकाणी गोंधळ उडाला होता. त्यामुळे खासदार विनायक राऊत यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
काम जबरदस्तीने सुरू करणार नाही : बारसू रिफायनरीबाबत महाराष्ट्रात वाद सुरू आहे. आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बारसू रिफायनरीचे काम जबरदस्तीने सुरू करणार नाही, जनतेवर अन्याय होऊ देणार नाही, असे सांगितले आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात बारसू रिफायनरी उभारली जात आहे. पण त्याला स्थानिक लोकांचा विरोध आहे. हजारो कोटींच्या या प्रकल्पावर बरेच राजकारण होत आहे. विरोधी पक्ष राजकारणाच्या नावाखाली या प्रकल्पाला विरोध करत असल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाकडून केला जात आहे.
जनतेवर अन्याय होणार नाही : आता निषेधाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी सांगितले की, कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र सरकार जनतेवर अन्याय करून किंवा जबरदस्तीने किंवा लोकांच्या इच्छेशिवाय बारसू रिफायनरी प्रकल्प सुरू करणार नाही. मुंबई-नागपूरच्या समृद्धी एक्स्प्रेस प्रकल्पाचे उदाहरण देत त्यांनी सांगितले की, सुरुवातीला या प्रकल्पालाही विरोध झाला होता. सर्व पक्षांना विश्वासात घेऊनच कोणतेही पाऊल उचलले जाईल, असे शिंदे म्हणाले. या प्रकल्पाला अजूनही अनेक लोक पाठिंबा देत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सध्या प्रकल्पाच्या ठिकाणी बोअरिंग, माती तपासणीचे काम सुरू असले तरी बारसू प्रकल्पाचे काम तातडीने सुरू होणार नाही.
काय आहे वाद : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील बारसू येथे पेट्रोकेमिकल प्लांट उभारला जाणार आहे. याअंतर्गत मेगा रिफायनरी-पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स बांधण्यात येणार आहे, मात्र या प्लांटच्या उभारणीमुळे परिसरातील जैवविविधता नष्ट होणार असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे स्थानिकांचा विरोध होत आहे.
हेही वाचा - Jiah Khan Death Case : जिया खान आत्महत्येप्रकरणी सुरज पांचोलीची निर्दोष मुक्तता