रत्नागिरी - मुंबईमध्ये झळकलेल्या 'फ्री काश्मीर'च्या फलक झळकवण्यात आले. हे प्रकरण गंभीर आहे. अशा फलकांचे मूळ खूप खोलवर असतात. त्यामुळे या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः मॉनिटरींग करावे. गृहखाते राष्ट्रवादीकडे आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे गांभीर्याने पाहावे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.
उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या बोगस डिग्रीचा वाद निरर्थक आहे. मात्र, एका माजी शिक्षण मंत्री आणि विद्यमान शिक्षण मंत्र्यांच्या एकाच विद्यापीठाच्या बोगस डिग्री बाबतीतला योगायोग पाहून मला गंमत वाटते, अशी मिश्किल प्रतिक्रिया देखील चंद्रकांत पाटील यांनी दिली.
रत्नागिरीतील ६ जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपच विजयाचा झेंडा फडकवेल. राज्यात अनैसर्गिक आघाड्या करून जे सरकार सत्तेत आले आहे, त्याबद्दल मतदारांमध्ये राग आहे. हा राग ते मतदानातून व्यक्त करतील, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच वारकरी विद्यापीठ व्हायलाच पाहिजे, शिवसेनेच्या या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. याबाबत आमचा सरकारला पूर्ण पाठिंबा असेल असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
कोल्हापुरातील मटण व्यवसायिकांसदर्भात बोलताना पाटील म्हणाले, की हा अतिशय नाजूक विषय आहे. सरकारने अनुदान द्यावे, असे मी सुचवणार नाही. यावर प्रशासनाने पुन्हा बैठक घ्यावी आणि हा प्रश्न सोडवावा, अशी सावध प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली.