रत्नागिरी - बोटींवर एलईडी लाईट बसवून मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र, तरीही काही मच्छिमार याचा वापर करतात. एलईडी लाईट बसवून मासेमारी करणाऱ्या एका ट्रॉलर(मासेमारी करणारी नौका)वर मत्स्य विभागाने कारवाई केली आहे.
भगवती बंदरापासून साडे अकरा नॉटिकल अंतरावर ही कारवाई करण्यात आली. मिरकरवाडा येथील अन्वर पांजरी यांचा हा ट्रॉलर असून, त्यावर एलईडी लाईट लावून मासेमारी केली जात होती. सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त भादुले आणि परवाना अधिकारी सावंत यांच्या उपस्थितीत सागरी गस्त सुरू होती. त्यावेळी भगवती बंदरापासून काही अंतरावर एलईडी लाईट लावलेल्या ट्रॉलरच्या माध्यमातून मासेमारी सुरू असल्याचे निदर्शनास आले. या ट्रॉलरला तत्काळ ताब्यात घेण्यात आले. त्यावर 20 किलो म्हाकुल मासे मिळाले आहेत. नौकेवरील 1 तांडेल 3 खलाशी यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन सुरू आहे. मात्र, मासेमारी व्यवसायाला केंद्र शासनाने काही नियम आणि अटींवर परवानगी दिली आहे. त्यामुळे सध्या मासेमारी सुरू झाली आहे. मात्र, नियमांचा भंग करणाऱ्या नौकांवर कारवाईसाठी यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली आहे.