रत्नागिरी - प्रखर विजेचा (एलईडी) वापर करून रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत मासेमारीसाठी आलेल्या गोव्यातील नौकेवर सागरी पोलिसांच्या साह्याने मत्स्य विभागाकडून कारवाई करण्यात आली. या नौकेला पाच हजार रुपयांचा दंड करण्यात आला असून जप्त केलेले लाखो रुपयांचे एलईडी दिवे नष्ट करण्याचे आदेश तहसिलदारांनी दिले आहेत.
गस्तीदरम्यान करण्यात आली कारवाई
परप्रांतीय नौकांकडून रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत धुमाकुळ घातला जात असल्याचे सातत्याने सांगितले जात आहे. त्याचा परिणाम म्हणून स्थानिक मच्छीमारांना मासळी मिळत नाही. याविरोधात कारवाई करण्यासाठी मस्त्य विभागाकडून पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय ना. वि. भादुले यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर परवाना अधिकारी संतोष देसाई आणि जयगड परवाना अधिकारी श्रीमती स्मितल कांबळे यांच्यासह पोलिसांच्या सागरी सुरक्षा रक्षक विभागाकडून गस्त घातली जात आहे.
या गस्तीवेळी समुद्रात एलईडीचा वापर करुन मासेमारी करणारी गोवा राज्यातील परप्रांतीय नौका आढळून आली. या पथकाने त्या नौकेच्या मालकावर अभिनिर्णय अधिकार्यांच्या कोर्टात केस दाखल करण्यात आली आहे. त्या नौकेवरील एलईडी लाईट्ससह अन्य साहित्य जप्त करण्यात आले असून नौका बंदरात ठेवण्यात आली आहे.