रत्नागिरी- रत्नागिरी जिल्ह्यातील अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदारांच्यावतीने १४ डिसेंबर रोजी आरमार विजय दिन साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी भगवती मंदिर येथे दुपारी ३ ते सायंकाळी ७.३० पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक राजीव किर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्रातील आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचा गौरवशाली इतिहास याला खुप महत्व आहे. महाराजांच्या काळात स्वराज्य निर्मितीबरोबरच स्वराज्य सांभाळण्यात आरमाराला विशेष महत्व होते. मायनाक भंडारी व इतर दर्यासारंगांच्या मदतीने वसूबारसच्या मुहूर्तावर छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण येथे सन १६५७ साली भारतातील पहिले मोठे आरमार उभे केले. त्यामुळे परकीय सत्तांना किनारी भागाकडून शिरकाव करता आला नाही. यामुळे याचे विशेष महत्व आहे. हा गौरवशाली इतिहास आरमार विजय दिन म्हणून साजरा केला जातो.
स्पर्धेचे आयोजन
आरमार दिनाचे औचित्य साधून शिवकालीन आरमार या विषयावर जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये महाविद्यालयीन गट आणि खुला गट अशा दोन गटात स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना तीन हजार, दोन हजार, एक हजार रुपये, अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.
मिरवणुकीने कार्यक्रमाला सुरुवात
१४ डिसेंबर रोजी मिरवणुकीने कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. श्री.भागेश्वर मंदिर किल्ला ते भगवती मंदिरापर्यंत मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध ज्ञाती समाजातील बांधव आपापल्या समाजाची राष्ट्रज्योत घेऊन येतील व किल्ल्यावर यज्ञकुंड उभारुन त्यामध्ये राष्ट्रज्योत एकत्र समर्पित करतील. त्याचबरोबर समाज बांधवांकडून राष्ट्रीयत्वाची प्रतिज्ञा घेतली जाईल. या मिरवणुकीत आरमार विषयक चार ते पाच चित्ररथ, ढोलवादन पथके, छ. शिवाजी महाराज व मावळ्यांची वेशभुषा परिधान केलेले घोडेस्वार असणार आहेत. दिवसभर शिवकालीन शस्त्रास्त्रे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्यक्ष शस्त्रास्त्रे प्रत्यक्षिक व युध्द प्रत्यक्षिक दाखविण्यात येणार आहेत.
मुख्य कार्यक्रम भगवती मंदिर येथे होणार
मुख्य कार्यक्रम भगवती मंदिर येथे होणार आहे. यावेळी सागरी आरमार, या उज्वल इतिहासावर पोवाडा सादरीकरण होणार आहे. या कार्यक्रमात आरमार उभारणीमध्ये ज्यांची प्रमुख भूमिका होती, असे सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुवीर आंग्रे हे उपस्थित राहणार आहेत. या पत्रकार परिषदेला संयोजक स्वप्निल सावंत, रघुवीर शेलार, कौस्तुभ सावंत, संतोष पावरी, मुन्ना सुर्वे, आदी उपस्थित होते.
हेही वाचा- मासे खातायत भाव! बदलत्या हवामानामुळे तुटवडा, भाव वधारले