रत्नागिरी - जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे. संपूर्ण जिल्ह्याला गेले दोन दिवस मुसळधार पावसाने झोडपले आहे. त्यामुळे नद्यांची पाणीपातळीही वाढली आहे. तर काही ठिकाणी वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे घराचे अंशतः नुकसान झाले आहे.
मागील २४ तासात जिल्ह्यात सरासरी ८७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस खेड तालुक्यात पडला असून खेडमध्ये तब्बल १४१ मिलिमीटर पाऊस गेल्या २४ तासात पडला आहे. त्याखालोखाल संगमेश्वरमध्ये १२३ तर दापोली तालुक्यात ११६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर चिपळूण आणि लांजा तालुक्यांमध्ये ९३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच मंडणगडमध्ये ६७, रत्नागिरी ५४, राजापूर ४९ आणि गुहागरमध्ये ४६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मागील २४ तासात काही ठिकाणी घरांचे नुकसान झाले आहे. खेड तालुक्यातील हेदली येथील मोहन घाणेकर यांच्या घराचे अंशतः साडेसहा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तर चिपळूणमधील कळंवडे येथील तुकाराम वरपे, दिनशाद चौगुले यांच्याही घराचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच संगमेश्वरमधील दीपक पितळे यांच्या घराचे अंशतः नुकसान झाले आहे.
मुंबई-गोवा महामार्ग ८ तास ठप्प
मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्ग ८ तास ठप्प झाला होता. खेडमधील जगबुडी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने बुधवारी रात्री ८ वाजता जगबुडी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. तसेच वाशिष्ठी नदीवरील पुलाची वाहतूकही थांबवण्यात आली होती. आज पहाटे ४ च्या सुमारास दोन्ही पूल वाहतुकीसाठी खुले करण्यात आले. त्यामुळे तब्बल ८ तास मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला होता.