रत्नागिरी - खेड तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात विलगीकरण केलेल्या ३८ जणांपैकी २८ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. मात्र, अद्याप दहा जणांचे अहवाल प्रतीक्षेत असल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन तालुका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
खेड तालुक्यातील अलसुरे येथील ५० वर्षाच्या व्यक्तीचा कोरोनाने बळी गेल्यानंतर तालुक्यात भीतीचे वातावरण होते. संबंधित व्यक्ती अलसुरे गावात वास्तव्यास होती. यानंतर संबंधित गावासह लगतचे कोंडिवली आणि भोस्ते गावे देखील सील करण्यात आली. तसेच पाच किलोमीटर पर्यंतचा संपूर्ण परिसर बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आला.
या व्यक्तीच्या नातेवाईकांसह संपर्कात आलेल्या एकूण ३८ जणांना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. यामध्ये त्याची पत्नी, तीन मुलगे, आई-वडील, सासू-सासरे, चुलते, त्याच्यावर उपचार करणारे खासगी डॉक्टर, रक्ताची तपासणी करणारी लॅब टेक्निशियन यांचा समावेश होता. यातील २८ जणांचे नमुने निगेटिव्ह आले; आणि प्रशासनासह साऱ्यांनीच सुटकेचा नि: श्वास सोडला. अद्याप दहाजणांचे रिपोर्ट येणे बाकी असल्याचे प्रांत अधिकारी अविशकुमार सोनोने यांच्याकडून सांगण्यात आले.