रत्नागिरी - खेड तालुक्यात कोरोनाचा पहिला बळी गेल्यानंतर तालुका प्रशासनाने कठोर उपाययोजना करायला सुरवात केली आहे. मृत झालेली व्यक्ती ज्या अलसुरे गावातील आहे, त्या गावांसह लगतचे कोंडिवली, निळीक आणि भोस्ते ही गावे देखील सिल केली आहेत. कोरोनाचा पहिला बळी ठरलेली व्यक्ती खेड शहरात वारंवार आल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाय त्याचा खेड शहरातील डाक बंगला परिसरात फ्लॅट असून परदेशातून आल्यावर सुरवातीचे काही दिवस तो तिथे राहिल्याचे स्पष्ट झाले असल्याने हा परिसरही सिल करण्यात आला आहे.
हातावर क्वारंटाईनचा शिक्का असतानाही त्याच्यावर ज्या खासगी डॉक्टरने उपचार केले त्या डॉक्टरच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा दवाखानाही सिल करण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आता आरोग्य विभाग आणि तालुका प्रशासनाने त्याची पत्नी, मुलं आई - वडील यांच्यासह तो ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात आला अशा २० जणांना ताब्यात घेऊन कळंबणी येथील आयशोलेशन वार्डमध्ये ठेवले आहे. या साऱ्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्याच्या अहवालाची प्रतिक्षा आहे . या घटनेने पोलीस, महसूल आणि आरोग्य यंत्रणेवरील ताण कमालीचा वाढला आहे.