रत्नागिरी- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशात लाॅकडाऊन सुरू आहे. लाॅकडाऊनमुळे देशभरात अनेक जण अडकून पडले आहेत. राजस्थानमधल्या कोटामध्येही राज्यातील काही विद्यार्थी अडकून पडले होते. मात्र, राज्य सरकारच्या प्रयत्नानंतर अखेर या विद्यार्थांना राज्यात आणण्यात यश आले आहे. यामध्ये रत्नागिरीतील 18 तर सिंधुदूर्गातील तीन विद्यार्थी होते. आज सकाळी हे विद्यार्थी रत्नागिरीत पोहचले.
हेही वाचा- विंचुरमध्ये पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, मालेगाव येथे बंदोबस्ताला गेलेल्या पोलिसाला संसर्ग
तब्बल 39 तासाच्या प्रवासानंतर हे विद्यार्थी रत्नागिरीत पोहचले आहेत. कोटा ते धुळे आणि त्यानंतर धुळे ते ठाणे, पनवेलमार्गे ते रत्नागिरीत दाखल झाले आहेत. विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी देशभरातून हजारो विद्यार्थी राजस्थानमधील कोटा येथे जात असतात. महाराष्ट्रातून हजारो विद्यार्थी कोटात जातात. मात्र, या विद्यार्थ्यांना यावेळी कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनचा फटका बसला आहे. अचानक लागलेल्या लाकडाऊनमुळे विद्यार्थी तिथेच अडकून पडले होते.
राज्यात परत येण्यासाठी या विद्यार्थ्यांनी सरकारकडे विनंती केली होती. या विद्यार्थ्यांचा सकारात्मक विचार करत राज्य सरकारने या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी धुळ्यातून कोटा इथे एसटी बस पाठवल्या. त्यामुळे राज्य सरकारच्या प्रयत्नानंतर अखेर या विद्यार्थांना राज्यात आणण्यात यश आले आहे. या बसेसमधून राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात विद्यार्थी दाखल होऊ लागले आहेत.
यामध्ये रत्नागिरीतील 18 तर सिंधुदूर्गातील तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आज सकाळी हे विद्यार्थी रत्नागिरी पोहोचले. कोट्यातून धुळे आणि त्यानंतर ठाणे, पनवेल मार्गे रत्नागिरी असा त्यांचा प्रवास झाला. 30 तारखेला दुपारी 3 वाजता हे विद्यार्थी कोटा येथून निघाले होते. दरम्यान रत्नागिरीत आलेल्या 18 विद्यार्थांमध्ये मंडणगडमधील 9, रत्नागिरी 6, दापोली 2 तर खेडमधील 1 विद्यार्थ्याचा समावेश आहे. रत्नागिरीच्या मुलांच्या बसमध्ये सिंधुदूर्गातील तीन मुले एसटी बसमधून आली. या सर्वांची वैद्यकीय चाचणी करुन त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे, अशी माहिती एसटी रत्नागिरी विभागाचे विभाग नियंत्रक सुनिल भोकरे यांनी दिली आहे.