रत्नागिरी - कोरोनाच्या भीतीपुढे अनेकांची इच्छाशक्ती दुबळी ठरताना दिसत आहे. अशा कठीण परिस्थितीत रत्नागिरी जिल्ह्यातील 108 वर्षांच्या एका आजीबाईंनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सावित्रीबाई तुकाराम निर्मळ असे या आजीबाईंचे नाव असून, खेड तालुक्यातील मुसाड गावच्या त्या रहिवासी आहेत.
कोरोनाला हरवू शकतो याचे उदाहरण
देशात कोरोनाची परिस्थिती भयावह झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत असली, तरी रत्नागिरी जिल्ह्यात मात्र दिवसेंदिवस मोठया प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडत आहे. त्यात मृत्यूचे प्रमाणही 3.46 टक्क्यांपर्यंत गेले आहे. दरम्यान कोरोनाला आपण हरवू शकतो हे दाखवून दिले आहे, खेड तालुक्यातील मुसाड गावातील 108 वर्षांच्या सावित्रीबाई तुकाराम निर्मळ या आजीबाईंनी..
सध्या प्रकृती उत्तम
सावित्रीबाई निर्मळ यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना कळंबणी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 26 मे ते 8 जूनपर्यंत त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. पहिले दोन दिवस त्यांना ऑक्सिजन लावण्यात आले होते. दरम्यान 8 जूनला त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या त्यांची प्रकृती उत्तम आहे. दरम्यान आपल्याला लवकर बरे होऊन घरी परतण्याची ओढ होती, त्यामुळेच देवाने आपल्याला सुखरुप घरी आणले, अशी प्रतिक्रिया सावित्रीबाई निर्मळ यांनी दिली आहे.
प्रेरणादायी उदाहरण
योग्य उपचाराबरोबरच मानसिक सामर्थ्य आणि धैर्याच्या बळावर कोरोनासारख्या आजारालाही सहज पराभूत करता येते, याचे प्रेरणादायी उदाहरण या 108 वर्षांच्या आजीबाईंनी सर्वांसमोर ठेवले आहे.
हेही वाचा - विनायक मेटे मराठा समाजाच्या हिताचे बोलत नाहीत, बाळासाहेब थोरातांचा पलटवार