रायगड- जलद गतीने जाणाऱ्या तेजस रेल्वे गाडीच्या धडकेने एका २१ वर्षीय तरुण मजुराचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना पेण तालुक्यातील हमरापूर गावाच्या हद्दीत घडली. संजय शंकर सावरा, असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
संजय (वय. २१, रा. वाडा, जि. पालघर, सध्या रा.हमरापूर) हा तरुण आपल्या कुटुंबासह गवत काढण्याच्या कामासाठी हमरापूर येथे आला होता. रविवारी नेहमीप्रमाणे तो रेल्वे लाईनच्या बाजूने गवत काढण्यासाठी जात असताना सकाळी साडेसातच्या सुमारास मुंबई ते मडगाव या तेजस एक्सप्रेसची त्याला जोरदार धडक बसली. या घटनेत संजयचा जागीच मृत्यू झाला.
घटनेचे वृत्त कळताच रेल्वे पोलीस तसेच दादर सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवार व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर संजयच्या मृतदेहास शवविच्छेदनेसाठी पेण येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. याप्रकरणी दादर सागरी पोलीस ठाण्यात ९/२०१९ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस कर्मचारी रमेश म्हात्रे करीत आहे.
हेही वाचा- मुंबई-गोवा महामार्ग होणार सुसाट; जून 2020 पर्यंत रुंदीकरण होणार पूर्ण !