रायगड - जिल्ह्यातील नागोठणे परिसरातील ४५ गावांना पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन जीर्ण झाल्याने पाईपलाईनचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले आहे. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. तर पर्यायी रस्त्यावरुन वाहतूक सुरु आहे.
जेएसडब्लू कंपनीतर्फे नागोठण्यातील ४५ गावांना सीएसआरअंतर्गत पाणी पुरवठा केला जातो. मुंबई-गोवा महामार्गावर नागोठणे गावाच्या हद्दीत चेनेज क्रमांक ४५ + ४५० या ठिकाणी पाईपलाईन नादुरुस्त झाल्याने पाणी गळती सुरू होती. त्यामुळे गेल्या पाच-सहा महिन्यांपासून पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन ही जीर्ण झाली होती. त्यामुळे तब्बल ४५ गावातील नागरिकांना पाण्यामुळे भीषण टंचाई निर्माण झाली होती. यासाठी ४५ गावातील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे याबाबत निवेदन दिले होते.
त्यानुसार जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने आज पाईपलाईनचे काम सुरू करण्यात आले आहे. म्हणून मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक नागोठणे-आमडोशी रस्ता, एमआयडीसी रोड ते नागोठणे महामार्ग अशी वळविण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तर पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यास वाहतूक पुन्हा मुंबई गोवा महामार्गावर सुरळीत सुरू होईल.