रायगड - पेण तालुक्यातील वाशी वढाव येथे प्रचाराला गेलेल्या आमदाराला जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. पेणचे शेकापचे आमदार आमदार धैर्यशील पाटील हे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारानिमित्त वाशी वढाव या गावात गेले होते. त्यावेळी महिलांनी त्यांना पाणी कधी देणार? असे विचारुन रोष व्यक्त केला.
या ठिकाणी गावातील विहिरीवर महिला पाणी भरत होत्या. त्यावेळी आघाडीच्या प्रचारासाठी आमदार धैर्यशील पाटील हे महिलांशी बोलण्यासाठी आले. त्यावेळी सर्व महिला संत्पत झाल्या व त्यांना पाणी कधी देणार, असे विचारले. तेव्हा मुख्यमंत्र्यांकडून ३० कोटी रुपयांचा निधी आणला आहे. अजून ३-४ महिने थांबा, आणखी २० कोटी रुपये मंजुर करून तुमच्या दारापर्यंत नळाने पाणी देईन, अशी विनवणी आमदार धैर्यशील पाटलांना करवी लागली.
निवडणूका जवळ आल्यानंतर लोकप्रतिनिधींना जनतेच्या दारी जावे लागते. त्यावेळी दिलेली वचने, आश्वासने पूर्ण केली नाहीत तर जनतेच्या रोषाला समोरे जावे लागते. त्यामुळेच आमदार धैर्यशील पाटलांनाही जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. तर २ दिवसांपुर्वी सुनील तटकरे यांच्या कन्येलाही नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते.