रायगड - स्त्रियांनी सुशिक्षित, स्वावलंबी, सक्षम व संघटित होणे गरजेचे आहे, असे मत महिला आर्थिक विकास महामंडळ अध्यक्षा ज्योती ठाकरे यांनी मांडले. खोपोली येथे शिवसेनेने आयोजीत केलेल्या 'प्रथम ती' या महिला संमेलनात त्या बोलत होत्या.
'प्रथम ती' या महिला संमेलनाचा तिसरा टप्पा खोपोली येथे राजश्री शाहू महाराज सभागृहात पार पडला. त्यावेळी उपस्थित महिलांसमोर ज्योती ठाकरे यांनी आपले विचार मांडले. या संमेलनाला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. 'प्रथम ती' ही युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची संकल्पना आहे. राज्यातील प्रत्येक महिलेसाठी हे संमेलन असून यात कोणताही पक्ष, जात, धर्माचा विचार केला जात नाही. आज पर्यंत महिलांसाठी असे संमेलन कुठल्याच पक्षाने घेतलेले नाही. शिवसेनेने हे पाऊल उचलून महिलांना सन्मान दिला आहे, अशी प्रतिक्रिया ज्योती ठाकरे यांनी दिली.
हेही वाचा - विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चाकरमान्यांकडे पुढाऱ्यांच्या पायघड्या
या कार्यक्रमाला खासदार श्रीरंग बारणे, सिनेट प्रतिनिधी शीतल देवरुखकर, माजी उपजिल्हा प्रमुख महेंद्र थोरवे, शिवसेना तालुका प्रमुख संतोष विचारे, शहर प्रमुख सुनील पाटील, महिला जिल्हा सल्लागार अनघाताई कानिटकर, जिल्हा संघटक रेखाताई ठाकरे यांच्यासह खालापुर आणि खोपोलीतील महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होते.