रायगड - औषधी गुणधर्म, रुचकर, कमी तिखटपणा यामुळे अलिबागाचा पांढरा कांदा हा प्रसिद्ध आहे. त्यामुळे अलिबागमधील कांद्याला प्रचंड मागणी असून 250 ते 300 रुपयापर्यंत या कांद्याला भाव मिळत आहे. मात्र, यावर्षी झालेल्या अतिवृष्टीने पांढऱ्या कांद्यावर बुरशीजन्य रोग आल्याने यावेळी शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले आहे. तसेच यंदा लागवडीचे प्रमाणही कमी झाले आहे.
हेही वाचा - आदिवासी आश्रमशाळेतील मुलीच्या आत्महत्येप्रकरणी तीन कर्मचारी निलंबित
रायगड जिल्ह्यात अलिबाग तालुका हा पांढऱ्या कांद्यासाठी प्रसिद्ध आहे. अलिबागच्या या पांढऱ्या कांद्यात उत्तम जीवनसत्व असल्याने या कांद्याला बाजारात प्रचंड मागणी आहे. अलिबागमध्ये 250 हेक्टरवर दरवर्षी पांढऱ्या कांद्याची लागवड केली जाते. मात्र, यावेळी अतिवृष्टीमुळे 232 हेक्टरवर कांद्याची लागवड करण्यात आली आहे. तर 18 हेक्टर लागवडीचे क्षेत्र हे रिकामे राहिले आहे.
भातशेती कापणी झाल्यानंतर अलिबागमधील शेतकरी हे पांढऱ्या कांद्याची लागवड करतात. मात्र, यावेळी अवकाळी पाऊस झाल्याने शेतात पाणी तसेच राहिल्याने कांद्याच्या रोपट्याच्या मुळांना बुरशी झाली. रोपटे काढून दुसऱ्या ठिकाणी लावली तरी बुरशीमुळे रोपटे हे सुकले गेले. त्यामुळे जानेवारी, फेब्रुवारी दरम्यान तयार होणारा पांढरा कांदा अद्यापही बाजारात आलेला नाही. तर आधी लावलेला पांढरा कांदा हा तयार झाला असून काढण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे.
हेही वाचा - अलिबाग मांडवा ते भाऊचा धक्का रो-रो बोटसेवा महिन्याभरात होणार सुरू