रायगड - शिक्षणाचे सार्वत्रिकरण झाले पाहिजे अशा भूमिकेचा मी आहे. राज्यात शिक्षण क्षेत्राची गुणवत्ता वाढवून ज्ञानाने समृद्ध-संपन्न नवी पिढी घडवली पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. जीवनातील कोणत्याही आव्हानांना तोंड देण्याची तयारी असलेले विद्यार्थी घडवण्याची जबाबदारी शिक्षकांनी घेतली पाहिजे, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली. पनवेल येथील व्ही. के. हायस्कूलच्या शतकमहोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते.
व्ही. के. हायस्कूलचा शतकमहोत्सवी कार्यक्रम रविवारी पार पडला. राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी हे या शाळेचे माजी विद्यार्थी असल्याने त्यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती होती. यावेळी बोलताना शरद पवार यांनी पनवेलमधील आठवणींना उजाळा दिला. उरणचे जेएनपीटी बंदर सुरू करताना मी राज्याचा मुख्यमंत्री होतो. हे जेएनपीटी बंदर देशाच्या समृद्धीचे केंद्र बनले आहे, असे गौरवोद्गार शरद पवार यांनी काढले.
हेही वाचा - शिवसेनेच्या आमदारांची घालमेल, अजूनही मंत्रिपदाचा कॉल नाही
निवडणुकीतील भाषणापेक्षा शिक्षण ही महत्त्वाची गोष्ट आहे. निवडणुकीत निवडून येणे सोपे असते. मात्र, प्रत्येक वर्गात पास होणे, ही कठीण गोष्ट आहे. राजकीय मतभेद बाजूला सारून एकत्र काम करणारे नेते हे फक्त पनवेलमध्येच दिसू शकतात, अशी भावना मनोहर जोशी यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी खासदार सुनील तटकरे, कोकण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार विवेक पाटील, जे. एम. म्हात्रे, मीनाक्षी पाटील हे उपस्थित होते.