रायगड - जिल्ह्यातील 78 ग्रामपंचायतीसाठी आज सकाळी साडे सात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. कोरोना नियमाचे पालन करून मतदारांना मतदानासाठी सोडले जात आहे. सकाळच्या सत्रात मतदान केंद्रावर तुरळक गर्दी पाहायला मिळत होती. तर, मतदान केंद्रावर निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिसांचाही चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.
78 ग्रामपंचायतींसाठी मतदान -
रायगड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. 78 ग्रामपंचायतींमधील एकूण 299 मतदान केंद्रांवर 15 जानेवारी रोजी मतदान होत आहे. 1 लाख 77 हजार 383 मतदार आपला मतदानाचा हक्क आज बजावणार असून 612 जागांसाठी 1 हजार 588 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.
कोरोना नियमांचे पालन करून मतदान सुरू -
आज सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली. मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदाराने मास्क लावले नसेल तर त्याला कक्षात सोडले जात नव्हते. प्रत्येक मतदाराचे तापमान, ऑक्सिजन तपासले जात आहे. मतदान केंद्राबाहेर सॅनिटायझरही ठेवण्यात आले आहे. त्यामुळे कोरोना नियमाचे पालन करून मतदार मतदान करत आहेत.