रायगड - कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन जाहीर केले असले तरी कोणीही व्यक्ती उपाशीपोटी राहणार नाही, अशी घोषणा शासन आणि प्रशासन करत आहे. रेशनवर सर्वांना धान्य मिळेल असे बोलले जात असताना बारकोड नसलेल्या आणि ऑनलाइन नोंदणी न केलेल्या रेशन कार्डधारकांना धान्य दिले जात नसल्याची बाब समोर आली आहे. एकीकडे प्रशासन परराज्यातील नागरिकांना स्वतःहून जाऊन धान्य जेवणाची व्यवस्था करत आहे. मात्र, जिल्ह्यातील रेशन कार्डधारक असलेल्या नागरिकांना बारकोड आणि ऑनलाइन नोंदणी केलेली नसल्याने रेशन धान्य मिळण्यापासून वंचित राहावे लागले आहे. याबाबत शासनस्तरावर वेळीच निर्णय घेणे गरजेचे आहे.
शासनाने अंतोदय आणि केशरी रेशनकार्ड धारकांना कार्डावर बारकोड देण्याची सुविधा केली होती. ऑनलाइन नोंदणीही करण्यात आली आहे. अनेकांनी रेशन दुकानावर जाऊन अर्ज भरून दिले होते. त्यांच्या रेशनकार्डला बारकोड देण्यात आलेले आहेत. तर काहींची ऑनलाइन नोंदही शासन दरबारी झाली आहे. मात्र, अजूनही अनेक अंतोदय आणि केशरी रेशनकार्ड धारकांनी अर्ज भरले नसल्याने बारकोड मिळालेले नाहीत. त्यामुळे ऑनलाइन नोंदणीही झालेली नाही. मात्र, या बारकोड न मिळालेल्या रेशनकार्ड धारकांची आता गोची झाली असून त्यांना ऐन गरजेच्या वेळी रेशन दुकानदार धान्य देत नाही. तहसील कार्यालयत हेलपाटे घालूनही त्यांना हात हलवत यावे लागत आहे. त्यामुळे दाद कोणाकडे मागायची अशी द्विधामनःस्थिती त्याची झाली आहे.
कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव पाहून शासनाने सगळीकडे लॉक डाऊन केले आहे. त्यामुळे काम बंद झाले. शासनाने लॉक डाऊन केले असले तरी कोणीही अन्नावाचून उपाशी राहणार नाही असे सांगितले आहे. रेशन दुकानावर 1 एप्रिलपासून तीन महिन्याचे एकत्रित धान्य मिळेल असे आधी सांगण्यात आले होते. रेशन दुकानावर मात्र एक महिन्याचे धान्य दिले जात आहे. हे धान्य ज्याच्या रेशन कार्डावर बारकोड आणि ऑनलाइन नोंदणी केली असेल त्यांनाच दिले जात आहे. त्यामुळे ज्याच्या कार्डावर बारकोड नाही, ते मात्र रेशनधान्यापासून वंचित राहत आहेत.
एकीकडे जिल्ह्यात अडकलेले परराज्यातील मजूर, कामगार यांना शासन स्वतःहून धान्य वाटप करत आहे. मात्र, दुसरीकडे रेशनकार्ड असून बारकोड आणि ऑनलाइन नोंदणी केली नसल्यामुळे जिल्ह्यातील व्यक्ती मात्र धान्यपासून वंचित राहत आहेत. अशी परिस्थिती जिल्ह्यातील जनतेची झाली आहे. त्यामुळे यावर शासनाने वेळीच तोडगा काढणे महत्वाचे आहे. अन्यथा परराज्यातील नागरिक भरपेट आणि जिल्ह्यातील रेशनकार्ड धारक उपाशी अशी परिस्थिती निर्माण होणार आहे.
अंतोदय, केशरी रेशनकार्ड धारकांच्या कार्डावर बारकोड असेल आणि ऑनलाइन नोंदणी केली नसेल तरी धान्य रेशन दुकानावर मिळेल. ज्यानी नोंद वा बारकोडची प्रक्रीया केली नसली तरी कोणीही रेशनकार्ड धारक धान्यपासून वंचित राहणार नाही.
मधुकर बोडके, जिल्हा पुरवठा अधिकारी
ज्याचे रेशनकार्ड आधार लिंक झाले नाही आणि ते रेशन धान्यपासून वंचित आहेत, त्यांचे ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करून अथवा ऑफलाईन पद्धतीने किंवा इतरांना जसे प्रशासन व सामाजिक संस्था धान्य पुरवठा करते अशा पद्धतीने त्याची समस्या सोडविण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. शासनस्तरावरही याबाबत पाठपुरावा सुरू आहे.
निधी चौधरी, जिल्हाधिकारी, रायगड