रायगड - जिल्ह्याला 240 किलोमीटरचा विस्तीर्ण समुद्र किनारा लाभला आहे. मात्र, त्याचबरोबर या समुद्रमार्गे दहशतवादी कारवाया करण्याची भीतीही मोठ्या प्रमाणात आहे. याच हेतूने जिल्हा पोलीस दलाकडून सागरी सुरक्षेच्या दृष्टीने 'सागर कवच अभियान' राबवण्यात येते. जिल्ह्यात सागरी सुरक्षा भक्कम रहावी या हेतूने 20 आणि 21 नोव्हेबर रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यत सागर सुरक्षा कवच राबवण्यात येणार आहे. यासाठी सागरी किनारी भागात चेकपोस्ट तयार करून पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. पोलिसांकडून संशयित असलेली वाहने तपासली जात आहेत.
हेही वाचा - शिवसेनेचे 17 आमदार नाराज असल्याच्या वृत्ताचे एकनाथ शिंदेंकडून खंडन
सागरी कवच अभियाननिमित्ताने पोलीस अधीक्षक 01, अप्पर पोलीस अधीक्षक 01, उप विभागीय पोलीस अधिकारी 08, पोलीस निरीक्षक 15, सपोनि/पोसई 49, पोलीस कर्मचारी 577, सागर सुरक्षा दल सदस्य 350 असा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
1990 मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्ब स्फोट हल्ल्यात आरडीएक्स हे रायगडमधील शेखाडीमार्गे नेण्यात आले होते. त्यानंतर जिल्ह्यातील सागरी सुरक्षा ही धोक्यात आली होती. त्यामुळे समुद्रमार्गे अथवा समुद्र किनारी रस्त्याने अतिरेकी कारवाईवर नजर ठेवण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात सागरी पोलीस ठाणे बनवण्यात आलेली आहेत. जिल्ह्यात मांडवा, दिघी, दादर, श्रीवर्धन, हरिहरेश्वर मुरुड, बोर्ली या ठिकाणी सागरी पोलीस ठाणे आहेत.
सागर सुरक्षा कवच अभियान दर सहा महिन्यांनी जिल्हा पोलीस दलाकडून राबवण्यात येते. जिल्ह्यातील सागरी किनारी भागात चेकपोस्ट तयार करून येणाऱ्या जाणाऱ्या संशयित वाहनांची तपासणी पोलिसांकडून केली जाते. जिल्ह्यात 20 आणि 21 नोव्हेबर असे दोन दिवस हे अभियान राबवण्यात येणार आहे. यासाठी चोख पोलीस बंदोबस्त जिल्ह्यात नेमण्यात आला आहे.