रायगड - मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात काल (9 जून) रोजी रात्री साडेनऊच्या दरम्यान दरड कोसळली होती. धामणदेवी जवळील महामार्गावर दरड काढण्याचे काम 12 तासांनंतरही सुरू असून पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने त्याच ठिकाणी पुन्हा दरड कोसळली आहे. यामुळे हा महामार्ग सायंकाळपर्यंत बंदच राहणार आहे. त्यामुळे दोन्ही बाजूला सहा किलोमीटर रांगा लागल्या आहेत. पोलीस आणि महामार्ग यंत्रणेकडून रस्ता सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
जिल्ह्यात गुरुवारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक सखल भागात पाणीही साचले आहे. बुधवारी (8 जून) रात्री आणि आज पहाटे महाड विन्हेरे मार्गावर दरड कोसळल्याने हा मार्ग बंद झाला होता. ही दरड काढल्यानंतर मार्ग वाहतुकीसाठी सुरू झाला.
मात्र गुरुवारी दुपारपासून जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून कशेडी घाटात धामणदेवी जवळ 200 मीटर पर्यंत दरड कोसळली आहे. यामुळे महामार्ग वाहतुकीस बंद आहे. सध्या दरड काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून 12 तास उलटले आहे. त्यामुळे महामार्गावारून वाहतूक करणाऱ्या प्रवाशांची यामुळे गैरसोय झाली आहे.