पनवेल- एखाद्या चित्रपटातील दृश्याप्रमाणे नवी मुंबई पोलिसांनी आपला जीव धोक्यात घालून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीचा जीव वाचवला आहे. वाशी खाडीमध्ये उडी घेऊन आत्महत्या करणाऱ्या २१ वर्षीय तरुणीचे प्राण वाहतूक पोलिसांनी वाचवले आहेत. वाहतूक पोलीस हवालदार सूर्यकांत बारस्कर, शिवाजी बसरे आणि दर्शन म्हात्रे, असे या धाडसी पोलिसांची नावे आहेत.
सर्वसामान्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांवर असते. मात्र, अनेकदा खाकी वर्दीतला पोलीस पाहिला की अनेकांना सुरक्षित वाटण्याऐवजी भीतीच वाटत असते. समाजात उभ्या राहिलेल्या पोलिसांच्या खराब प्रतिमेसाठी चित्रपट आणि पोलीस खातेही तितकेच जबाबदार आहे. पण फक्त काही जणांमुळे संपूर्ण खात्याला दोष देणं चुकीचं. खात्यात काही असेही असतात ते जीव धोक्यात घालून नागरिकांची सुरक्षा करत असतात. वाशीत घडलेल्या घटनेमुळे हे सिद्ध झाले आहे.
काल मंगळवारी सायंकाळी वाशी खाडी पुलाजवळ एक २१ वर्षाची विवाहित तरुणी तिच्या नवऱ्यासोबत व्हिडिओ कॉलवर बोलत होती. दोघांचे बोलणे सुरू असतानाच अचानक दोघांमध्ये वाद सुरू झाले. हा वाद इतका टोकाला गेला की तिने आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. वाशी खाडी पुलावर उभी राहून खाडीत उडी मारून आत्महत्या करण्याचा तिने प्रयत्न केला. ही बाब जवळच असलेल्या वाहतूक पोलिसांच्या लक्षात आली. पोलिसांनी प्रसंगवधान राखत याची माहिती सहकाऱ्यांना दिली. एखाद्या चित्रपटातील दृश्याप्रमाणे वाहतूक पोलीस हवालदार सूर्यकांत बारस्कर, शिवाजी बसरे आणि दर्शन म्हात्रे यांनी तरुणीला वाचवण्यासाठी खाडीत उडी मारली आणि तिला जीवदान दिले.
बाहेर काढल्या नंतर तरुणी ही बेशुद्धावस्थेत होती. ही तरुणी चेंबूरमधील विष्णुनगर येथील रहिवासी आहे. शुद्धीवर आल्यानंतर वाशी पोलिसांनी तिला नातेवाईकांच्या स्वाधीन केले. दरम्यान तरुणीला जीवदान देणाऱ्या बहादुर पोलिसांनी दाखवलेल्या धैर्याचे कौतुक केले जात असून पोलीस प्रशासनानेही त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.