खालापूर (रायगड) - येथील खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चौक आऊट पोस्टच्या क्षेत्रात 9 पर्यटकांपैकी एक जण पार्थ कोरा (रा. मुलुंड, वय - 25) हा पोहता येत नसल्याने आणि तळाचा अंदाज न आल्याने 23 मे दुपारी 4 वाजताच्या सुमारास बुडाला होता. हे सर्व पर्यटक माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांच्या फार्महाऊसवर पर्यटनासाठी आले होते. आंतरराष्ट्रीय स्कुबा डायव्हर दर्श अभानीच्या साहाय्याने मृतदेह शोधण्यास यश आले.
दुसऱ्या दिवशी शोधमोहीम सुरू -
पार्थ कोरो बुडाल्याची माहिती मिळताच, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, खोपोली नगरपालिकेच्या फायर ब्रिगेड टीमने 23 मे रात्रीपर्यत मृतदेह शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन केले होते. मात्र त्यात यश मिळाले नाही. यानंतर खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते आणि चौकचे पोलीस उपनिरीक्षक बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली 24 मेला सकाळी पुन्हा पहाटे 6 वाजता शोधमोहीम सुरू केली. आंतरराष्ट्रीय स्कुबा डायव्हर दर्श अभानी याच्या नेतृत्वाखाली विजय भोसले, अभिजित घरत, अमोल कदम, राजेश पारठे, कार्तिक गोयल यांनी प्रत्यक्ष पाण्यात उतरून सर्च सुरू केले होते. तसेच गुरुनाथ साठेलकर, अक्षय आणि पूजा चांदूरकर (साठेलकर), भक्ती साठेलकर, अमित गुजरे यांनी मदतनीस म्हणून जबादारी पार पाडली. चार ते पाच प्रयत्नात पार्थ कोरा याचा खोल कपारीत अडकलेला मृतदेह बाहेर काढण्यात दर्श अभाणी यांना यश आले.
हेही वाचा - योगगुरु बाबा रामदेव यांनी व्यक्त केली दिलगिरी, वक्तव्य घेतले मागे
पार्थचा मृतदेह चौक पोलिसांच्या स्वाधीन केला. हा मृतदेह येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ठेवण्यात आला. स्कुबा डायव्हिंगचे साहित्य याक एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून उपलब्ध झाले. तसेच पोलीस निरीक्षक अनिल विभूते आणि पोलीस उपनिरीक्षक यांनी या कामगिरीबद्दल अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी टिमचे कौतुक केले आहे. खालापूरचे तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी देखील अपघातच्या टीमच्या कामगिरीबद्दल कौतुक केले.
हेही वाचा - ब्लाऊजने गळा आवळून सुनेने केला सासूचा खून, मृतदेह झाडीत फेकताना सीसीटीव्हीत कैद