रायगड : जिल्ह्यातील उरण तालुक्यात असणाऱ्या जागतीक ख्यातीच्या घारापुरी बंदरावरील ( Gharapuri Port ) व्यावसायिक जनजीवन पूर्ववत होण्यास सुरुवात झाली आहे. कोरोना काळामध्ये दोन वर्षे पर्यटन बंदीमुळे येथील व्यवसाय पूर्णतः बंद झाले होते. यामुळे येथील नागरिकांवर उपासमारीची वेळ आली होती. हलाखीच्या दोन वर्षातून आज पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची संधी मिळाल्याने चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे.
कोरोनात घरातील दागिने विकले : मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणारे घारापुरी बंदर हे येथील लेण्यांमुळे प्रसिद्ध आहे. तर येथील जनजीवन येथे येणाऱ्या पर्यटकांवर अवलंबून आहे. छोट्या दुकानांमधून भेटवस्तू, शोभेच्या वासू, खाद्यपदार्थ, शीतपेय विक्री करून येथील नागरिक आपला उदरनिर्वाह करत असतात. मात्र कोरोना काळामध्ये परतं बंदी असल्याने दोन वर्षे येथील व्यवसाय पूर्णतः ठप्प झाला होता. यामुळे येथील नागरिकांवर उपासमारीची वेळ आली होती. आपल्या घरातील दागिने विकण्याची वेळही या नागरिकांना सोसावी लागली आहे.
पर्यटन पुन्हा पूर्वपदावर : सामाजिक कार्यकर्ते आणि संघटनांच्या माध्यमातून येणाऱ्या मदती स्वीकारून कसाबसा आपल्या संसाराचा रेटा हाकून कोरोना काळातील दोन वर्षे खडतर जीवन जगण्याचा प्रयत्न येथील नागरिकांनी केला आहे. मात्र आता येथील पर्यटन पुन्हा पूर्वपदावर ( Tourism Life Starts ) येत असल्याने, येथील नागरिकांचे व्यावसायिक जीवन स्थिरावण्याची संधी मिळाली आहे. व्यावसायाला पुन्हा सुरुवात झाली असताना कोरोना काळातील आठवणी विचारल्या असता या व्यावसायिकांच्या चेहऱ्यावर कभी खुशी, कभी गम हे भाव पाहायला मिळत आहेत.
व्यवसाय आणि पर्यटन वाढीसाठी प्रयन्त : घारापुरी म्हणजेच एलिफंटा ( Elephanta ) हे बंदर पूर्णतः पर्यटनावर आधारित असून, येथील नागरिक पर्यटनातून निर्माण होणाऱ्या व्यवसायावर अवलंबून आहेत. यामुळे येथील व्यवसायाच्या दृष्टीने तसेच पर्यटन वाढीच्या दृष्टीने प्रयन्त होणे गरजेचे ( Need Tourism Growth ) असल्याच्या भावनाही येथील नागरिक व्यक्त करत आहेत.