रायगड - परतीचा पाऊस अजूनही रायगडकरांची पाठ सोडत नसून पुन्हा पश्चिम अरबी समुद्रात मामाहा चक्रीवादळ निर्माण झाले आहे. मामाहा चक्रीवादळ अरबी समुद्रात तयार झाल्याने रायगडच्या समुद्रकिनारपट्टीला अतिवृष्टी होणार असून हे चक्रीवादळ 1 ते 8 नोव्हेबर पर्यत राहणार आहे. समुद्र खवळलेला असल्याने मच्छमारी करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे.
पश्चिमी अरबी समुद्रात मामाहा चक्रीवादळ निर्माण झाले आहे. हे चक्रीवादळ गुजरात, कर्नाटक, गोवा राज्यात धडकणार असून याचा फटका रायगडच्या किनारपट्टीलाही बसण्याची शक्यता आहे. या पावसामुळे शेतकरी आणि मच्छीमार चिंतेत सापडला आहे.
चार दिवसापूर्वी क्यार चक्रीवादळाने थैमान घातले असताना पुन्हा मामाहा हे चक्रीवादळ आल्याने समुद्र खवळलेला आहे. त्यामुळे मत्स्य विभागाकडून मच्छीमाराना मासेमारीसाठी जाण्यास बंदी घातली आहे. जिल्हा प्रशासनाकडून समुद्र किनारी आणि नदीकिनारील गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. दुपारनंतर जिल्ह्यात पावसाळी वातावरण निर्माण झाले असून अलिबागसह किनारपट्टी भागात पावसाने सुरुवात केली आहे.