रायगड - रायगड जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची पहिली बॅच ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात सुरू होणार असल्याची माहिती पालकमंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता आपल्याच जिल्ह्यात डॉक्टरी शिक्षण घेण्याची संधी प्राप्त झाली आहे.
सप्टेंबर पर्यंत बांधकाम पूर्ण करण्याच्या सूचना
वैद्यकीय शासकीय महाविद्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचे काम अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात सुरू आहे. यासाठी 15 कोटींचा निधी शासनाने मंजूर केला आहे. मेडिकलच्या विद्यार्थ्यांची पहिली बॅच ऑगस्ट महिन्यात सुरू करण्याचा पालकमंत्र्यांचा मानस आहे. त्यानुसार योग्य पद्धतीने काम सुरू आहे की नाही याबाबतची पाहणी पालकमंत्री अदिती तटकरे यांनी केली. मात्र कामाची गती कमी असल्याने कार्यकारी अभियंता आणि ठेकेदार याना सप्टेंबर पूर्वी इमारतीचे काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
ऑगस्ट महिन्यात सुरू करणार पहिली मेडिकल बॅच
उसर येथे मेडिकल कॉलेज तयार होत असून यासाठी 406 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. प्रत्यक्ष उसर येथे कामाला सुरुवात झालेली नाही. मेडिकल कॉलेजच्या जागेची आणि सुरू होत असलेल्या बॅचच्या पूर्व तयारीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथकही येणार आहे. त्यादृष्टीने पूर्व तयारीची कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना आज पालकमंत्री अदिती तटकरे यांनी सूचना केल्या आहेत. आरसीएफ येथील लेक्चर रूमची पाहणीही पालकमंत्र्यांनी केली आहे. मेडिकल विद्यार्थ्यांची जिल्ह्यातून पहिली बॅच सुरू करणार असल्याचे पालकमंत्री अदिती तटकरे यांनी यावेळी सांगितले.
डॉक्टर, परिचारिका वसाहत इमारतीचीही केली पाहणी
जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिका यांच्या वसाहत इमारती धोकादायक झाल्या आहेत. त्याचबरोबर अस्वच्छतेच्या गर्तेत सापडल्या आहेत. या वसाहत इमारतीची पाहणी पालकमंत्री अदिती तटकरे यांनी केली. यावेळी इमारती परिसरात पसरलेल्या अस्वच्छतेबाबत पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त करून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तर इमारत दुरुस्ती कामांबाबत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
पहिली बॅच सुरू करण्याच्या अनुषंगाने पालकमंत्री अदिती तटकरे यांनी आज अलिबाग जिल्हा रुग्णालय, आरसीएफ आणि उसर येथे कामाची पाहणी केली. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन गिरीश ठाकूर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता मोरे, प्रांताधिकारी प्रशांत ढगे, तहसीलदार सचिन शेजाळ व इतर अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा - दुय्यम निबंधक कार्यालयाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष