पेण (रायगड) - तिसरी महामुंबई म्हणून ओळख निर्माण झालेल्या पेण परिसरात विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) पुन्हा डोके वर काढू लागले आहे. मात्र सेझ विरोधी संघर्ष समिती आक्रमक झाली असून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी 24 गावे सेझ विरोधी संघर्ष समितीची महत्वपूर्ण बैठक पेण येथे झाली आहे. सेझसाठी दिलेल्या शेत जमीनी शेतकऱ्यांना परत कशा मिळवून देता येतील यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली.
सेझ संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष सुभाष म्हात्रे यांच्या अध्यक्षेतखाली ही बैठक झाली. यावेळी आर.के.पाटील, दिलीप पाटील, काशिनाथ पाटील, सी.आर.म्हात्रे, सी.जी.पाटील, राजन झेमसे, चंद्रहास म्हात्रे, किरण म्हात्रे, गंगाधर ठाकूर, विजय पाटील उस्थित होते.
यावेळी आर. के. पाटील म्हणाले, 'गोरगरीब शेतकरी सध्या संभ्रमात आहेत. त्यांना योग्य सल्ल्याची आवश्यकता आहे. सेझ कडून शेतकऱ्यांची फसवणूक होण्याचा धोका वाटत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमीनीवरील सेझ कंपनीचे नाव कमी करण्यासाठी गावोगावी बैठका घेण्याची गरज आहे.'
एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या सेझ विरोधी लढाईत वाशी, वढाव विभागाने ही लढाई जिंकली होती, त्यावेळी झालेल्या जनमत चाचणीत सेझला 96% शेतकऱ्यांनी विरोध नोंदविला होता. शेतकऱ्यांनी विकलेल्या जमिनी कायदेशीर मार्गाने शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे लक्षात आल्याने सेझ कंपनी आता वेगवेगळ्या मार्गाने स्थानिक एजंटाना मध्ये टाकून शेतकर्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असल्याचे आरोप दिलीप पाटील यांनी केला.
गेल्या काही दिवसांपासून खारेपाट विभागात कागदावर सहया घेवून शेतकऱ्यांच्या आधार कार्डच्या झेरॉक्स गोळा केल्या जात असल्याचे बैठकीत निदर्शनास आणून देण्यात आले. सेझ हद्दपार करण्यासाठी जसे आपण सर्वजण एकत्र लढलो, त्याच पद्धतीने शेतकऱ्यांच्या जमिनी शेतकऱ्यांना पुन्हा मिळवून देण्यासाठी लढाई लढू आणि आपण ती जिंकू अशी आशा काशिनाथ पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी बैठकीचे अध्यक्ष सुभाष म्हात्रे यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी मिळवून देण्यासंदर्भात कायदे विषयक महत्वाचे मार्गदर्शन केले. या बैठकीत दिलीप पाटील यांची 24 गाव सेझ विरोधी संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.