रायगड - कोरोनामुळे शाळा बंद आणि ऑनलाइन शिक्षण सुरू, असे चित्र सध्या सगळीकडे पहायला मिळत आहे. रायगड जिल्ह्यातही अशीच परिस्थिती आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन शिक्षण घेण्याच्या सुविधा नाहीत, अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे हाल होऊ नये यासाठी शिक्षण विभाग झटताना दिसत आहेत. अलिबाग तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी साडे पाच हजार विद्यार्थ्यांना ऑफलाइन शिक्षण मिळावे यासाठी 'अलिबाग तालुका शिक्षण मंच अभ्यासमाला' सुरू केली आहे. विद्यार्थ्यांना शाळेत ज्या पद्धतीने शिक्षक शिकवतात तशा पीडीएफ फाईल तयार करून, ब्लॉगच्या माध्यमातून शिक्षण देण्याची कल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्वखर्चाने अभ्यासमालेच्या पीडीएफ दिल्या आहेत.
कोरोना काळात विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी शाळा बंद ठेवण्यात आल्या असून ऑनलाइन शिक्षण सुविधा सुरू केली आहे. मात्र, ऑनलाइन शिक्षण हे शहरी भागात शक्य असले तरी ग्रामीण भागात अनेक पालकांकडे अँड्रॉईड मोबाईल नसल्याने शिक्षणात अडचणी येत आहेत. अलिबाग तालुक्यात फक्त 20 टक्के पालकांकडे फोन असून 80 टक्के पालकांकडे फोन नाहीत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात यामुळे अडचण येऊ नये यासाठी अलिबाग तालुका शिक्षण मंचच्या शिक्षकांनी पुढाकार घेतला आहे.
शिक्षकांनी एकत्र येऊन पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी 'अलिबाग तालुका शिक्षण मंच अभ्यासमाला' ही साईट आणि ब्लॉग तयार केला आहे. यामध्ये शिक्षक शाळेत ज्या पद्धतीने शिकवतात तसे धडे तयाक करून साईटवर अपलोड केले आहेत. त्याचबरोबर शिक्षक, अधिकारी, पालक यांनी शिक्षणाला उपयुक्त विषयावर ब्लॉग लिहिण्याचीही सुविधा तयार करण्यात आली आहे. ऑफलाइन तसेच ऑनलाइन शिक्षणाची सुविधा या माध्यमातून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षकांनी बनवलेल्या या अभ्यासमालेचा उपयोग होणार आहे.
खासगी शाळा सध्या पुस्तकी ज्ञान देण्यात धन्यता मानत असताना शासनाच्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने विचार करून उत्तम शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहेत. अलिबाग गटशिक्षण अधिकारी प्रकाश कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक सुबोध पाटील, रवींद्र थळे, नरेंद्र गुरव, प्रमोद भोपी, शंकर पाटील, के आर पिंगळा आणि सर्व केंद्र प्रमुख यांच्या सहकार्याने ही अभ्यासमाला उपक्रम राबवण्यात आला आहे.