रायगड - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी शासन आणि जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने लागू केली आहे. संचारबंदी काळात अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त खासगी वाहनांद्वारे रस्त्यावर अनावश्यकरित्या फिरणाऱ्यांना बंदी घालण्यात आली होती. मात्र, तरिही या नियमांची पायमल्ली करणाऱ्या 36 हजार वाहन चालकांना कारवाईला सामोरे जावे लागले असून पोलीस प्रशासनाने त्यांच्याकडून 1 कोटी 24 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
हेही वाचा... राज्यात दोन दिवसात ६२ कोटी ५५ लाख रुपयांची मद्य विक्री
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढत गेला असून शासन आणि प्रशासनाकडून कडक पाऊले उचलली गेली होती. गर्दीची ठिकाणे टाळण्याचे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले होते. अत्यावश्यक सेवेच्या वाहनाशिवाय इतर दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहनांना रस्त्यावर फिरण्यास बंदी केली होती. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पोलिसांनी गस्ती चौकी तैनात केल्या होत्या. त्यामुळे पोलिसांकडून अनावश्यक फिरणाऱ्या वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उचलला होता.
अनावश्यक बाहेर पडू नका असा आदेश असताना अनेक वाहन चालक हे आपली वाहने घेऊन रस्त्यावर सर्रास फिरत होते. या फिरणाऱ्या वाहन चालकांवर जिल्हा पोलिसांनी कारवाई केली होती. त्यानुसार 36 हजार वाहन चालकांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती. कारवाईमधून जिल्ह्यातून पोलिसांनी या वाहन चालकांकडून दंड वसुली केली असून त्याच्याकडून एक कोटी रुपये वसूल केले आहेत.