रायगड - ६ जून रोजी किल्ले रायगडवर शिवराज्याभिषेक सोहळा दरवर्षी साजरा होत आहे. गेल्यावर्षीपासून आलेल्या कोरोना महामारी हा सोहळा साधेपणाने साजरा केला जात आहे. मात्र, यावेळी मराठा आरक्षण प्रश्न ऐरणीवर असल्याने छत्रपती खासदार संभाजीराजे यांनी ६ जून रोजी किल्ले रायगडवर येण्यास शिवभक्तांना आवाहन केले आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे पाचाड ग्रामपंचायतीने १ ते ६ जून दरम्यान कडक जनता कर्फ्यु लागू केला आहे. त्यामुळे ६ जून रोजी किल्ले रायगडावर होणाऱ्या शिवराज्यभिषकासाठी गर्दी करू नये असे आवाहन ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीराजे 6 जून रोजी किल्ले रायगडवर भूमिका करणार स्पष्ट -
मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. छत्रपती खासदार संभाजीराजे हे मराठा आरक्षणाला राजकीय नेत्यांचा पाठिंबा मिळावा आणि आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी राज्यभर दौरा करीत आहेत. 6 जूनपूर्वी राज्य सरकारने यावर आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी विनंती खासदार संभाजी राजे यांनी केली आहे. अन्यथा ६ जून रोजी किल्ले रायगडवर शिवराज्यभिषक दिनी आमची भूमिका स्पष्ट करू, असा इशाराही दिला आहे.
पाचाड मध्ये कडक जनता कर्फ्यु -
किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावात सध्या कोरोना जोमाने वाढत आहे. त्यादृष्टीने पाचाड ग्रामपंचायतीने १ ते ६ जून या दरम्यान कडक जनता कर्फ्यु लागू केला आहे. पाचाडमधील सर्व दुकाने पूर्णतः बंद करण्यात आलेली आहेत. या दरम्यान कोणीही गावात वा किल्ले रायगडावर येऊ नये, असे आवाहन ही ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीराजेंच्या भुमिकेकडे सर्वांचे लक्ष -
६ जून रोजी किल्ले रायगडावर शिवराज्यभिषक सोहळा होणार आहे. याठिकाणी छत्रपती खासदार संभाजीराजे यांनी मराठा समाजाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे पाचाड येथे जनता कर्फ्यु लागला असताना किल्ले रायगडवर जाण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले तर आरोग्याचा आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे छत्रपती संभाजीराजे याबाबत नक्की काय भूमिका घेणार याकडे आता लक्ष लागले आहे.
हेही वाचा - यंदापासून 'शिवराज्याभिषेक दिन' होणार 'स्वराज्य दिन' म्हणून साजरा