रायगड - कोकणात एकही रासायनिक प्रकल्प येऊ देणार नाही, अशी घोषणा करणारे खासदार सुनिल तटकरे हे मुरुड रोहा येथे येणाऱ्या फार्मा पार्क प्रकल्पाबाबत दुट्टपी भूमिका घेत आहे, असा आरोप रायगड-दक्षिणचे भाजपचे अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी केला. शेतकऱ्यांना फार्मा पार्क प्रकल्प नको असताना शासन आणि प्रशासन आडमुठी भूमिका घेत असल्याचेही भूमिका मोहिते यांनी मांडली.
अलिबाग तुषार विश्रामगृह येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला अनेक शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
खासदार सुनील तटकरे यांनी केंद्रीय रसायन मंत्री गौडा याची दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी तटकरे यांनी रोहा, मुरुड परिसरात फार्मा पार्क प्रकल्प व्हावा, यासाठी गौडा यांना 3 फेब्रुवारी 2021ला निवदेन दिले. यामध्ये त्यांनी या परिसरात हा प्रकल्प उभारण्यासाठी जमीन उपलब्ध होणार असल्याचे म्हटले आहे. या प्रकल्पासाठी चार हजार 900 हेक्टर भूसंपादित होणार आहे.
हेही वाचा - पद्मश्री गिरीश प्रभुणे: ज्यांनी पालावरच्या पारधी समाजातील मुलांना दिला गुरूकुलमचा 'आधार'
महेश मोहितेंचा आरोप -
रोहा, मुरुड येथे 19 गावातील शेतकऱ्यांची सुपीक जमीन, घरे या फार्मा प्रकल्पात जात आहे. फार्मा पार्क हा रासायनिक प्रकल्प आहे. या प्रकल्पाला शेतकऱ्याचा तीव्र विरोध आहे. याबाबत प्रशासनाकडे हरकती शेतकऱ्यांनी नोंदविल्या आहेत. असे असताना शासन आणि प्रशासन शेतकऱ्यांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून प्रकल्प थोपवू पाहत आहे. खासदार तटकरे यांनी कोकणात एकही रासायनिक प्रकल्प येऊ देणार नाही, अशी भूमिका खासदार झाल्यानंतर घेतली होती. मात्र, त्यांनी आपल्या भूमिकेला हरताळ फासला असून दुट्टपी भूमिका घेतली असल्याचा आरोप महेश मोहिते यांनी केला.
18 फेब्रुवारी रोजी वळके येथे जनसुनावणी -
शेतकऱ्यांना प्रकल्प नको असताना आणि हरकती असतानाही उद्या (गुरुवारी) 18 फेब्रुवारीला मुरुड तालुक्यातील वळके जनसुनावणी होणार आहे. ही जनसुनावणी प्रांताधिकारी शारदा पोवार यांच्या अध्यक्षतेखाली दोन टप्प्यात होणार आहे.