रायगड - अलिबाग तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या उमटे धरणातील गाळ काढण्याच्या कामाला अखेर आज (24 मे) सुरूवात झाली. रायगडचे खासदार सुनील तटकरे आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत हे काम सुरू झाले. या कामामुळे धरणातील पाणीसाठा वाढून मे अखेरपर्यंत पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे.
40 वर्षांत एकदाही काढला नाही गाळ
रायगड जिल्हा परिषदेच्या उमटे धरणातून अलिबाग तालुक्यातील 60 गावांना पिण्यासाठी पाणी पुरवठा केला जातो. परंतु गेल्या 40 वर्षात या धरणातील गाळ एकदाही काढण्यात आला नाही. आताच्या घडीला धरणाच्या पात्रात तब्बल 38 हजार 500 क्युबिक क्विंटल इतका गाळ साचला आहे. या गाळामुळे धरणाची साठवण क्षमता कमी झाली आहे. शिवाय येथील नागरीकांना गाळाचे पाणी मिळत होते. त्यामुळे मे अखेरपर्यंत पाणी पुरत नव्हते. याबाबत स्थानिकांमध्ये प्रचंड असंतोष होता.
स्थानिकांचा आंदोलनाचा इशारा
दोन वर्षांपूर्वी स्थानिक ग्रामस्थांनी एक दिवस श्रमदान करून गाळ काढला आणि जिल्हा परिषदेला आपल्या नाराजीची आठवण करून दिली. परंतु परिस्थिती जैसे थे होती. मागील काही दिवसांत स्थानिकांनी पुन्हा हा मुद्दा उचलून धरला आणि गाळ न काढल्यास आंदोलनाचा इशारा दिला. अखेर मागील आठवड्यात झालेल्या जिल्हा परिषदेच्या सभेत या धरणातील गाळ काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
आमदार महेंद्र दळवी, खासदार सुनील तटकरे यांनी केला पाठपुरावा
अलिबागचे आमदार महेंद्र दळवी व खासदार सुनील तटकरे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे उमटे धरणातील गाळ काढण्यासाठी यंत्रसामुग्री उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा केला. त्यानंतर या कामासाठी राज्याच्या जलसंपदा विभागाची मोठी मदत झाली. जलसंपदा विभागाने यासाठी लागणारी सर्व यंत्रसामुग्री उपलब्ध करून दिली आहे. रायगड जिल्हा परिषदेने डिझेल व इतर खर्चासाठी 25 लाख रूपयांची तरतूद केली आहे. पुढील 15 दिवसांत हे काम पूर्ण होईल, असे सांगण्यात आले. पावसाळ्यापूर्वी गाळ निघाला तर धरणाच्या साठवण क्षमतेत वाढ होईल. त्यामुळे परिसरातील नागरीकांना मे अखेरपर्यंत पाणी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे.
हेही वाचा - '१२ आमदारांवर कोणते संशोधन सुरु आहे?'