पेण-रायगड : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शासनाने जे नियम लागू केले होते, त्यामुळे अनेक बहिणींना आपल्या लाडक्या भाऊरायाला राखी (Rakshabandhan 2022) बांधण्यासाठी जाणे-येणे शक्य झाले नव्हते. मात्र यावर्षी हे नियम शिथिल करण्यात आले असल्याने; बहिणींची राख्या खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी (Sisters train to buy rakhi) पाहायला मिळत आहे. मात्र वाढती महागाई लक्षात घेता, मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी वीस ते पंचवीस टक्क्यांनी या राख्या महाग (Rakhi is expensive) झाल्या. त्यामुळे बहिणींच्या बटव्याला थोडा आर्थिक फटका बसणार आहे.
कार्टूनच्या राख्यांना प्रचंड मागणी : पावसाने घेतलेल्या विश्रांतीचा फायदा घेऊन या बहिणी आतापासूनच राख्या खरेदी करण्यासाठी बाहेर पडत आहेत. यावर्षी बाजारात कार्टून्स, चंदन, स्टोन्स, मोती, ब्रेसलेट, सिल्वर, गोल्डन, लटकन आदी प्रकारच्या राख्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तर लहान मुलांसाठी खास भावाचा फोटो असलेल्या राख्या बाजारात बघायला मिळत आहेत. मागील अडीच वर्षात कमी प्रमाणात प्रतिसाद मिळाला असला तरी; यावर्षी मागील वर्षाच्या तोट्याची भर निघेल, अशी अपेक्षा राखी विक्रेते करत आहेत. बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या राख्यांमधे कार्टूनच्या प्रकारात गणेश, छोटा भीम, डोरेमॉन, मोटू - पतलु, स्पायडर मॅन, पिकचु, तर दोरी मध्ये चंदन, रुद्राक्ष, गोंड, बुलबुल, लटकन आदी प्रकारच्या राख्या उपलब्ध आहेत.
पोस्टाने राख्या पाठविण्याचा आनंद : पोस्टाने राख्या पाठवण्याची पद्धत आजही कायम असून; अनेकजण आजही पोस्टाने राख्या पाठवत आहेत. आपला मानलेला भाऊ असो वा सख्खा भाऊ, पण ते दूर राहत असेल आणि आपल्याला जाणे शक्य होत नसेल, किंवा त्याला कामानिमित्त सुट्टी नसेल आणि घरी उपलब्ध होत नसेल तर, अनेक बहिणी पोस्टानेच राख्या पाठऊन आपल्या भावाबाबत असलेला प्रेम व्यक्त करत असतात. तर सध्याच्या धक्काधक्कीच्या जीवनात अनेक महीला वर्ग देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कामाला जायला लागल्या आहेत. त्यामूळे त्यांना देखील सुट्टी नसल्याने भाऊरायाला राखी बांधायला जायला मिळत नसेल तर, त्या देखील पोस्टाने राख्या पाठवत आहेत. याशिवाय अनेक बहिणी आपला भाऊ देशाच्या सीमेवर देशाचे रक्षण करण्यात गुंतला असेल तर, त्या देखील पोस्टानेच राख्या पाठवत आहेत. एकंदरीतच पोस्टाने राख्या पाठवण्याची परंपरा आजही कायम असुन त्यात वाढ झालेली दिसत आहे.
व्यावसाय़िकांचे मत : राखी पौर्णिमेला अजुन वेळ असला तरी, अनेक बहिणी या पोस्टाने राख्या पाठवत असतात. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही लवकरच आमची दुकाने थाटली आहे. मागील अडीच वर्षांच्या कोरोना काळात आम्ही आमच्या व्यवसायाला मुकलो होतो. त्यामुळे यावर्षी तरी रक्षाबंधनमुळे आमचा व्यवसाय चांगला होईल, अशी अपेक्षा व्यावसाय़िकांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा : Rakshabandhan 2022 : विशेष मुलांनी बनवलेल्या राख्यांना सातासमुद्रापलीकडून मागणी!