रायगड - जिल्ह्यात अकरा दिवसांचा लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर जीवनावश्यक दुकाने ही पूर्णपणे बंद होती. लॉकडाऊनला तीन दिवस झाले असताना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आज (दि. 18 जुलै) जिल्हा पोलीस अधीक्षक क्षेत्रातील किराणा दुकाने, भाजीपाला, दूध, चिकन, मटण, मासे, फळे दुकाने सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत उघडण्याचा नवीन अध्यादेश काढला आहे. त्यामुळे रायगडकरांची रविवारची (दि. 19 जुलै) गटारी ही जोरात साजरी होणार आहे.
जीवनावश्यक वस्तू विक्री करणाऱ्या दुकानदारांनी याबाबत जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना निवेदन दिले होते. ईटीव्ही भारतने दुकानाना शिथिलता देण्याबाबत मटण व्यवसायिकांची बातमी प्रसिद्ध केली होती.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालकमंत्री, आमदार यांच्या झालेल्या बैठकीत पुन्हा जिल्ह्यात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार पालकमंत्री यांनी 15 जुलै ते 24 जुलै पर्यंत लॉकडाऊन करण्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली होती.
त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी 15 जुलै ते 26 जुलैच्या मध्यरात्री पर्यंत लॉकडाऊनबाबत अध्यादेश काढला होता. या काळात जीवनावश्यक वस्तूची दुकाने ही पूर्णपणे बंद राहणार होती. मात्र, किराणा सामान, मटण, चिकन, मासे, भाजीपाला, फळे याची घरपोच सेवा देण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, जीवनावश्यक वस्तूची घरपोच सेवा देणे शक्य नसल्याने दुकानदार व्यावसायिकांनी लॉकडाऊनमध्ये दुकाने उघडण्याची परवानगी देण्याबाबत जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना निवेदन दिले होते.
त्यानुसार जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आज नवीन आदेश काढले. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय क्षेत्रात किराणा दुकान, चिकन, मटण, मासे, फळे, भाजीपाला, दूध ही दुकाने सकाळी 6 ते 11 वाजेपर्यत उघडी ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रविवारी गटारी सण साजरा होत असल्याने जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या या आदेशाचे दुकानदारांनी आभार मानले आहे. जिल्ह्यात रविवारी गटारी साजरी होत असल्याने मटण, चिकन दुकानेही उघडी राहणार असल्याने सकाळीच दुकानावर खरेदीसाठी गर्दी पाहायला मिळणार आहे. रायगडातील गटारी या निर्णयामुळे जोरात साजरी होणार हे मात्र नक्की.