कामोठे (नवी मुंबई): नवी मुंबईतील कामोठे येथील एम.जी.एम रुणालयात दोन मृत व्यक्तींच्या मृतदेहाची अदला बदल (Dead Body Swapping In MGM Hospital) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना सुपूर्द केल्यानंतर अंत्यविधीची तयारी सुरू झाल्यानंतर रुग्णालय ( MGM Hospital in Kamothe) प्रशासनाच्या लक्षात हि बाब आली. नंतर मृतांच्या नातेवाईकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. मृतांचे चेहरे काहीप्रणाणात मिळते जुळते असल्याने हा प्रकार घडल्याचं स्पष्टीकरण रूग्णालयाने दिले आहे.
मृतदेह होते शवागृहात: (bodies in mortuary) रायगड जिल्ह्यातील अलिबाग पेझरी येथे राहणाऱ्या रमाकांत पाटील यांच्या छातीत तिव्र वेदना होत असल्याने त्यांना कामोठे येथील एम.जी.एम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, सोमवारी रात्री उशिरा रमाकांत यांचे उपचारादरम्यान निधन झाले. रात्री निधन झाल्यामुळे त्यांचा मृतदेह सकाळी ताब्यात घेऊन अंत्यविधी करण्याचा निर्णय त्यांच्या कुटूंबियांनी घेतला. त्यामुळे सोमवारी रात्रभर रमाकांत यांचा मृतदेह एम.जी.एम रुग्णालयातील शवागृहात ठेवण्यात आला.
चेहऱ्यात साम्य असल्याने : रमाकांत पाटील यांचे निधन झाले. त्याचवेळी सोमटणे येथील राम पाटील यांचेही निधन झाले होते. रमाकांत पाटील यांचे नातेवाईक त्यांचा मृतदेह घेण्यास रुग्णालयात आले असता, त्यांना शवागृहातून चक्क चेहऱ्यात साम्य असल्याने नजरचुकीने राम पाटील यांचा मृतदेह सुपूर्द केला गेला. हा मृतदेह घेऊन रमाकांत पाटील यांचे नातेवाईक पेझारीला गेले तिथे अंत्यविधीची तयारी सुरू होती. त्याचवेळी राम पाटील यांचा मृतदेह बदली झाल्याचे त्यांच्या नातेवाईकांच्या लक्षात आले. त्यांनी ही बाब शवागृहात कळविली. त्यानंतर पेझारी येथील रमाकांत पाटील यांच्या नातेवाईकांना मृतदेह बदली झाल्याचे कळविण्यात आले. त्यावेळी रमाकांत यांच्या नातेवाईकांची चांगली त्रेधातिरपीट उडाली. त्यानंतर हे बदली झालेले मृतदेह (Dead Body Swapping) नातेवाईकांच्या ताब्यात देऊन पुन्हा बदली करण्यात आले.