रायगड - शेतकऱ्यांनी 8 डिसेंबर रोजी भारत बंदची हाक दिली आहे. भारत बंदला रायगड जिल्ह्यातही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळावा, यासाठी शेतकरी कामगार पक्षही बंदमध्ये सामील होत आहे. कार्यकर्त्यांनी या बंदमध्ये सहभागी होऊन भारत बंदला यशस्वी करण्यासाठी शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी आवाहन केले आहे.
केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाविरोधात देशात असंतोष पसरला आहे. पंजाबमधील शेतकरी गेल्या काही दिवसापासून दिल्ली येथे ठाण मांडून बसले आहेत. मात्र, अद्यापही कृषी विधेयकावर तोडगा निघालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे हे आंदोलन चिघळण्यास सुरुवात झाली आहे. देशभरात 8 डिसेंबरला भारत बंदची हाक शेतकरी संघटनांनी दिली आहे.
भारत बंदला शेकपचा पाठिंबा -
8 डिसेंबर रोजी होणाऱ्या भारत बंदला शेतकरी कामगार पक्षाने पाठिंबा दिला आहे. आमदार जयंत पाटील यांनी या बंदमध्ये कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले आहे. भारत बंद हा रायगड जिल्ह्यातही यशस्वी करण्याबाबत सूचना कार्यकर्त्यांना आमदार जयंत पाटील यांनी दिल्या आहे. दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला शेकपचा पूर्ण पाठिंबा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.