रायगड - माणगाव तालुक्यातील वारक आदिवासी वाडीवरील जिल्हा परिषदेच्या शाळेची भिंत अतिवृष्टीने कोसळली. सुदैवाने शाळा भरण्यापूर्वी भिंत कोसळल्याने जीवितहानी टळली. मात्र, या घटनेनंतर जिल्हा परिषदेच्या दुरावस्थ झालेल्या शाळांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
जिल्ह्यात काही भागात पावसाने विश्रांती घेतली असली तरी माणगाव, महाड, पोलादपूर या तालुक्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे. माणगाव तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसाने वारक आदिवासी वाडीवरील जिल्हा परिषदेच्या शाळेची भिंत सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास पडली. यामुळे शाळेची इमारत, कौले, शाळेतील वस्तूंचे नुकसान झाले आहे.
या शाळेत पहिली ते चौथीपर्यंत वर्ग असून येथे २४ विद्यार्थी शिकत आहेत. तर भिंत पडताना शाळेत विद्यार्थी व शिक्षक नसल्याने होणार अनर्थ टळला. मात्र, शाळेची भिंत पडल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पर्यायी जागेची व्यवस्था करणे गरजेचे आहे. दरम्यान, या घटनेमुळे जिल्हा परिषदेच्या शाळांच्या इमारतीचा प्रश्न उपस्थित झाला आहे.