रायगड - अलिबागेतील समुद्रात पोहण्यास गेलेल्या तरुणाला बुडताना वाचविण्यात यश आले आहे. प्रवीण क्षीरसागर (25) असे बुडणाऱ्या तरुणाचे नाव आहे. प्रवीण यास तातडीने जीवरक्षक यांनी बाहेर काढून त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून तरुणाचे प्राण वाचविले असले तरी पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले आहे. विशेष म्हणजे प्रवीण हा तरबेज पोहणारा आहे.
पुणे येथून आले होते पर्यटनास
पुणे गुरुवार पेठ येथून प्रवीण क्षीरसागर हा आपल्या पाच ते सहा मित्रांसोबत अलिबाग येथे पर्यटनास आला होता. आज सकाळी अलिबाग समुद्रात भरती सुरू असताना प्रवीण हा कंबर भर पाण्यात पोहण्यास गेला. तर बाकी मित्र हे किनाऱ्यावर उभे होते. मात्र अचानक प्रवीण बुडण्यास लागल्याने जीवरक्षक आणि मित्रांनी त्याला तातडीने बाहेर काढले. बाहेर आल्यानंतर स्थानिक आणि जीवरक्षकांनी त्याच्या पोटातून पाणी बाहेर काढले आणि तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.
डॉक्टरांकडून तातडीने उपचार
प्रवीण याला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात आयसीयूत हलविण्यात आला. त्यानंतर डॉक्टरांनी तातडीने प्राथमिक उपचार करून प्रवीणचे प्राण वाचविले. तर पुढील उपचारासाठी प्रवीण याला पुणे येथे हलविण्यात आले आहे.