रायगड - राष्ट्रवादी काँग्रेसला गळती लागल्याचे चित्र महाराष्ट्रात दिसत असतानाच रायगडातूनही कार्यकर्त्यांची नाराजी लपलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रघुवीर देशमुख यांच्या पाठोपाठ रायगड जिल्हा उपाध्यक्ष संतोष निगडे यांनीही पक्ष सदस्यत्वाचा आणि जिल्हा उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा खासदार सुनिल तटकरे यांच्याकडे संतोष निगडे यांनी आपला राजीनामा पाठवून दिला आहे. गेली 9 वर्षे संतोष निगडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. त्यांनी पक्षसंघटना वाढविण्यासाठी अपार मेहनत घेतली. परंतु गेल्या काही वर्षात आघाडीच्या राजकारणात अलिबागमधील माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचा कोंडमारा होत आहे. आघाडीतील मित्र पक्षाकडून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पाण्यात पाहिले जाते आणि त्या संदर्भात तक्रार करूनही पाहिजे तसा प्रतिसाद दिला जात नाही. केवळ आघाडीचा धर्म पाळण्यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचा बळी दिला जात आहे, असा आरोपही संतोष निगडे यांनी आपल्या राजीनामा पत्रात केला आहे.
विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे संतोष निगडेंसारख्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणे, हे राष्ट्रवादी काँग्रेससाठी धक्कादायक आहे. निगडे यांचा जनसंपर्क दांडगा आहे. त्यांना मानणारा एक विशिष्ट वर्ग आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा राष्ट्रवादीला मोठा धक्का आहे. अलिबागेत आधीच कमकुवत असलेली राष्ट्रवादी आता खिळखिळी झाली आहे. दरम्यान अलिबाग तालुक्यातील राष्ट्रवादीचे आणखी काही पदाधिकारी पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचे समजते. सूत्रांच्या माहितीनुसार निगडे पुन्हा शिवसेनेचा भगवा खाद्यावर घेणार असून लवकरच ते सेनेत प्रवेश करणार आहेत.