रायगड - राज्यात सातत्याने महिलांवरील अत्याचार, विनयभंग, बलात्काराच्या घटना वाढत आहे. तरीही महाविकास आघाडी सरकारच्या संवेदना गोठलेल्या आहेत. राज्यात अशा घटना रोज घडत असताना सरकारला अशा गंभीर घटनांची नोंद घ्यावीशी वाटत नाही. पोलिस प्रशासनावर सरकारचा कुठलाही वचक नाही व धाक राहिलेला नाही. त्यामुळे रोहा येथील प्रकरणातील गुन्हेगारांविरुध्द कठोर कारवाई करुन हा खटला जलदगतीने चालवावा आणि आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.
रोहा तालुक्यातील तांबडी येथे एका 14 वर्षीय मुलीवर बलात्कार करुन तिची निघृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली होती. यानंतर प्रविण दरेकर यांनी आज (मंगळवारी) तातडीने सकाळी घटनास्थळी भेट दिली. त्यांच्यासमवेत माजी मंत्री रविंद्र चव्हाण, भाजप नेत्या चित्रा वाघ, माधवी नाईक, महेश मोहिते, अमित घाग आदी उपस्थित होते.
यावेळी दरेकर म्हणाले, रोहामध्ये घडलेली ही घटना अतिशय हृदय हेलावणारी आहे. माणुसकीला काळीमा फासणारे असे कृत्य नराधामांनी केले आहे. एका निष्पाप मुलीवर नराधामांनी बलात्कार करुन तिची क्रूरपणे हत्या केली. राज्यामध्ये महिलांविरुध्द अशा भयंकर घटना रोज घडत असताना सरकार नावाची यंत्रणा गप्प बसली आहे. सरकारकडून कुठलेही भाष्य होत नाही. जनतेला आत्मविश्वास आणि धीर देण्याची आवश्यकता आहे.
हेही वाचा - धक्कादायक..! कोरोनाबाधिताचा मृतदेह नातेवाईकांनी जबरददस्तीने नेला उचलून
ग्रामीण भागातील मुली, महिला या घरापासून लांब शाळेत, शेतावर आणि बाजारकामासाठी बाहेर जात असतात. मात्र, आता या गंभीर परिस्थितीत वाड्या-वस्त्यांवरील आपल्या मुलींना तरुणींना, महिलांना घरातून बाहेर पाठावयाचे का?, असा प्रश्न त्यांच्या आई वडिलांना पडला आहे. त्यामुळे या गंभीर प्रकरणांची सरकारने दखल घ्यावी आणि या प्रकरणाचा तपास योग्य पध्दतीने करुन दोषींना कठोर शासन करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच या प्रकरणात भाजपच्या वतीने चांगला वकील देण्यात येईल व मुलींच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यात येईल, असे आश्वासनही दरेकर यांनी यावेळी दिले.
दरम्यान, या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांबद्दल कुटुंबीयांच्या मनात शंका आहेत. कारण, ती मुलगी खेळाडू होती. कबड्डी, कराटे खेळणारी होती, त्यामुळे तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला असावा, असा अंदाज तिच्या कुटुंबीयांनी व्यक्त केल्याची माहितीही दरेकर यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना दिली.