रायगड - जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. गोरेगावमध्येही पावसाचा जोर असल्याने काळ नदीला पूर आला आहे.
काळ नदी किनारी चिंचवली येथील धरणाजवळ असलेल्या फार्म हाऊसमध्ये पुराच्या पाण्यामुळे अडकलेल्या 25 जणांना बचाव मोहीम राबवून सुखरूप स्थळी हलवले. महेश सानप यांच्या बचाव पथकाने सर्व नागरिकांना बोटीने सुखरूप स्थळी आणले.
4 ते 6 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जाहीर करण्यात आले आहे. पावसाचा जोरही वाढला असल्याने नद्या ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
गोरेगाव तालुक्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे गोरेगावमधील काळ नदीला पूर आला आहे. गोरेगावमधील चिंचवली काळ नदीवरील धरणाजवळ असलेल्या एका फार्म हाऊसवर 25 जण पुराच्या पाण्यात अडकले होते. याबाबतची माहिती प्रशासनाला कळल्यानंतर महेश सानप यांच्या बचाव पथकाला पाचारण केले. पथकाने बोटीच्या साहाय्याने या 25 जणांना सुखरूप स्थळी हलविले आहे. तीन फेऱ्या मारून सर्वांना बाहेर काढण्यात आले.