रायगड - जिल्ह्यातील उमटे धरणाच्या सांडव्याच्या भिंती ढासळल्या आहेत. तसेच मातीमिश्रीत पाण्याचा पुरवठा होत असल्याचे वृत्त ईटीव्ही भारतने प्रकाशित केले होते. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासन खडबडून जागे झाले असून सांडव्याच्या भिंतीला पडलेले भगदाड बुजवण्यासाठी ठेकेदाराला सूचना देण्यात आल्या आहेत.
उमटे धरणाच्या सांडव्याच्या भिंतीची दुरावस्था झाली आहे. तसेच अनेक ठिकाणी भिंतीचे दगड पडून मोठमोठे भगदाड पडले आहे, तर धरणातील मातीमिश्रित पाणी नागरिकांना नळावाटे सोडले जाते. हे अशुद्ध पाणी प्यायल्याने नागरिक आजारी पडायला लागले. याबाबत ईटीव्ही भारतमधून बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्याचाच धसका घेत जिल्हा परिषदेने नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी सोडण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
ईटीव्ही भारतने प्रकाशित केलेले वृत्त वाचण्यासाठी इथं क्लिक करा...
उमटे धरणाला कोणताही धोका नाही आहे. तसेच धरणाच्या सांडव्याच्या भिंतीला पडलेले भगदाड भरण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. येत्या दोन दिवसात भिंतीचे भगदाड भरून पूर्ण होतील. तसेच जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू करून नागरिकांना शुद्ध पाणीही दिले जाणार आहे. यासाठी ठेकेदाराला जलशुद्धीकरण प्रकल्पावर जिल्हा परिषदेचा एक कर्मचारी ठेवण्याच्या सूचना दिल्या असल्याचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र कोळी यांनी सांगितले.