रायगड - आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोर्चे बांधणी करण्यासाठी भाजपच्या रायगड जिल्हा कार्यकारिणीची बैठक आज पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी रायगड जिल्हा संपूर्ण शत प्रतिशत भाजपमय करणार, असे वक्तव्य पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.
अलिबागमधील मेघा टॉकीजमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार प्रवीण दरेकर, कोकण निरीक्षक सतीश धोंड, माजी मंत्री रवींद्र पाटील, अलिबाग मुरूड विधानसभा अध्यक्ष अॅण्ड. महेश मोहिते, तालुकाप्रमुख हेमंत दांडेकर तसेच जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी विविध पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी पालकमंत्री यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला.
विधानसभा निवडणूक ही ४ महिन्यांवर आली आहे. त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यातील तालुका पातळीवर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी जिल्हा कार्यकारणी बैठक आयोजित केली होती. रायगड लोकसभा निवडणुकीत भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी उत्तम काम केले असले तरी अपयश आले. त्यामुळे आपण कुठे कमी पडलो, मते कुठे कमी पडली याचा अभ्यास करून त्या ठिकाणी पक्ष वाढीसाठी आतापासून प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
भाजपत अनेक पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी येण्यास इच्छुक असून त्यांना पक्षात घेण्यासाठी आणि इतर पदाधिकारी यांना पक्षात आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळे भाजप वाढण्यासाठी मदत होईल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे रायगड भाजपमय करण्याचे स्वप्न पूर्ण होईल, असेही पालकमंत्री म्हणाले.
विधानसभा निवडणुकीत काय भूमिका असणार याबाबत चव्हाणांना प्रश्न विचारला असता, त्यांनी मुख्यमंत्री जो निर्णय घेतील त्यानुसार कार्यकर्ते काम करतील, असे सांगितले. तर रायगडमध्ये किती जागा लढविणार याबाबत विचारले असता त्यांनी भाजपला पोषक वातावरण आहे, असे उत्तर दिले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगडात भाजप कामाला लागली असून आतापासूनच त्यांनी मोर्चे बांधणी करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत रायगड मधील किमान ३ जागांवर भाजप दावा करू शकेल, असे चित्र तयार झाले आहे.