रायगड - अमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील, रिलायन्स या अॅपच्या मार्फत ग्राहकांना घरबसल्या गरजेच्या जीवनावश्यक वस्तू ऑनलाईन ऑर्डर केल्यानंतर घरपोच मिळत आहेत. कोरोनाच्या या संकट काळात किराणा, भाजीपाला, मटण, मासे या जीवनावश्यक वस्तू या घरपोच मिळाव्या यासाठी अलिबागमधील सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणांनी एकत्र येऊन माय रायगड हे ऑनलाईन अॅप तयार केले आहे. त्यामुळे अलिबाग तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील नागरिकांना ऑनलाईन मार्फत घरबसल्या किराणा, भाजीपाला, मटण, मासे, दूध हे घरपोच मिळणार आहे. कोरोना काळात गर्दी टाळण्याच्या दृष्टीने या ऍपचा वापर केल्यास कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठीही याचा उपयोग होणार आहे. अलिबाग तहसीलदार सचिन शेजाळ यांच्या हस्ते या अॅपचे उदघाटन करण्यात आले.
सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणाचे ऑनलाईन खरेदी अॅप, अलिबागकरांना घरपोच मिळणार जीवनावश्यक वस्तू अलिबागसह जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव हा वाढू लागला आहे. बाजारात खरेदी साठी नागरिक गर्दी करत असून सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळले जात नाहीत. अनेक वेळा तोंडाला मास्क ही वापरत नसतात. यामुळे कोरोना बाधा होण्याची भीती निर्माण झालेली आहे. कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या लॉकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तूची दुकाने बंद राहणार आहेत. त्यामुळे किराणा सामान, भाजीपाला, दूध, मटण, चिकन याची खरेदी कशी करायची हा एक प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.
'माय रायगड' अॅप देणार ऑनलाईन सेवा नागरिकांच्या या प्रश्नावर अलिबागमधील सॉफ्टवेअर इंजिनियर असलेला हर्षल कदम या तरुणाने उपाय शोधला आहे. रिलायन्स, अमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील या ऑनलाइन कंपनीच्या धर्तीवर हर्षल कदम याने माय रायगड हे ऑनलाईन खरेदी ऍप तयार केले आहे. माय रायगड या ऍपच्या माध्यमातून ग्राहक हे किराणा सामान, भाजीपाला, दूध याची ऑनलाईन खरेदी करू शकतात. हे अॅप सध्या अलिबाग तालुक्यातील पाच ते सहा किलोमीटर परिसरासाठी पहिल्या टप्यात ही सुविधा देण्यात येणार आहे. त्यानंतर अलिबाग तालुक्यासह जिल्ह्यात अॅपच्या मार्फत ही सुविधा सुरू केली जाणार असल्याचे हर्षल कदम याने सांगितले आहे. कोरोना काळात नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने माय रायगड हे अॅप फायदेशीर ठरणार असून आगामी काळात याचा फायदा हा रायगडकरांना होणार आहे, असेही हर्षल कदम यांनी म्हटले.
'माय रायगड' अॅप देणार ऑनलाईन सेवा माय रायगड हे ऑनलाईन अॅप प्ले स्टोअरवर असून ते डाउनलोड करायचे आहे. इतर ऑनलाईन अॅप सारखी सुविधा यामध्ये देण्यात आलेली आहे. ग्राहकांना गुगल पे, पेटीएम, कॅश ऑन डिलिव्हरी, डेबिट कार्ड यामार्फत पैसे देण्याची सुविधा देण्यात आली आहे. तसेच एखादी वस्तू बदलण्याची सुविधाही ग्राहकांना दिली गेली आहे.