रायगड - रोहा नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदी असताना बाळासाहेब चव्हाण यांनी नियमबाह्य कामे केल्याचे आढळून आले होते. यामुळे त्यांची बदली करण्यात आली होती. मात्र, आता त्यांचीच पुन्हा रोह्यात मुख्याधिकारी म्हणून बदली केल्याच्या निषेधार्थ रोहेकर राज्याच्या नगरविकास मंत्रालयाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढणार आहेत. तसे पत्र प्रधान सचिव नगरविकास यांना देण्यात आले आहे.
रोहेकर काढणार राज्याच्या नगरविकास मंत्रालयाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा -
बाळासाहेब चव्हाण यांना पुन्हा रोहा नगरपालिकेचा कार्यभार नगरविकास मंत्रालयाने सोपविल्याने रोहा शहरात नाराजीचे सूर पसरले आहेत. बाळासाहेब चव्हाण यांनी अनेक नियमबाह्य कामे केली असल्याचे आढळून आल्यानंतर त्यांची येथून बदली करण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा त्यांनाच रोहा नगरपालिकेचा पदभार दिल्याने, याचा निषेध करण्यासाठी बुधवार दिनांक 28 ऑगस्टला राज्याच्या नगरविकास मंत्रालयाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्याचा निर्णय रोहा सिटीझन्स फोरमच्या बैठकीत घेण्यात आले आहे. तसे पत्र नगरविकास मंत्रालयाला फोरमच्या वतीने देण्यात आले आहे.
बाळासाहेब चव्हाण हे रोहा नगरपालिकेत 2012 ते 2015 या वर्षात मुख्यधिकारी म्हणून काम करीत होते. बाळासाहेब चव्हाण यांनी आपल्या साडेतीन वर्षाच्या कार्यकाळात अनेक अनियमित कामे केली होती. याबाबत चव्हाण यांच्या विरोधात रोह्यातील सामाजिक कार्यकर्ते, जनतेने 23 तक्रारी जिल्हाधिकारी यांच्याकडे केल्या होत्या. तसेच लाच लुचपत विभागाकडेही चव्हाण यांची तक्रार त्या काळी केली होती. त्यानंतर 2015 ला चव्हाण यांची उमरगा, जि. उस्मानाबाद येथे बदली झाली होती.
बाळासाहेब चव्हाण हे अक्रियाशील व भ्रष्टाचारी अधिकारी आहेत, असा आरोप करत त्यांनाच पुन्हा रोहा नगरपालिकेचा पदभार दिल्याने रोहा सिटीझन्स फोरमने आवाज उठवला आहे. नियमबाह्य आणि बेकायदेशीर कामकाजाबद्दल मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांची व त्यांनी केलेल्या नियमबाह्य कामांची चौकशी व्हावी अशी फोरमची मागणी केली आहे. या प्रकाराच्या निषेधार्थ नगरविकास मंत्रालयाची अंत्ययात्रा रोहा शहरात काढत असल्याचे, या पत्रात म्हटले आहे. आपल्या गावातील चुकीचे कामकाज थांबविण्यासाठी सर्वांनी काहीवेळ पक्षभेद आणि राजकीय भूमिका बाजूला ठेवून रोहेकर म्हणून या निषेध अंत्ययात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन फोरमचे सहकार्यवाह अॅड. हर्षद साळवी यांनी केले आहे.