रायगड - मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम 2011पासून सुरू झाले आहे. अतिशय संथ गतीने हे काम सुरू आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांना भेटून काम लवकर पूर्ण करण्यास सांगितले आहे. तसेच महामार्गावरील खड्डे त्वरित न बुजवल्यास तुम्हालाच खड्यात गाडू, असा इशाराही मनसेने दिला आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर चौपदरीकरणाच्या कामामुळे खड्डे आणि धुळीचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी महामार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे लहान-मोठ्या वाहनचालकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. इंदापूरपासून दुसऱ्या टप्प्याचे काम हे एल अँड टी कंपनीला दिले आहे. मात्र, अधिकाऱ्यांच्या कचखाऊपणामुळे महामार्गच्या कामाला गती मिळालेली नाही.
याच पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने महाडमध्ये एल अँड टी कंपनीला रस्त्याच्या परिस्थितीबाबत निवेदन देण्यात आले. कंपनीने महामार्ग वेळेवर दुरुस्त केला नाही, तर मनसेच्यावतीने आंदोलन केले जाईल. कंपनीचे अधिकारी रस्त्यावर दिसले तर, त्याच खड्ड्यात अधिकाऱ्यांना गाडू, असा इशारा मनसेचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष चेतन उत्तेकर यांनी दिला. मनसेचे देवेंद्र गायकवाड व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.