रायगड - उरण विधानसभा मतदारसंघात भाजपचे महेश बालदी यांनी बंडखोरी केली आहे. महायुतीचे उमेदवार मनोहर भोईर यांच्या विरोधात महेश बालदी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महेश बालदी यांच्याबाबत पक्षनेतृत्व लवकरच निर्णय घेईल, अशी प्रतिक्रिया भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली.
जिल्ह्यातील ७ मतदारसंघात शिवसेना-भाजप यांची महायुती आहे. अलिबाग, कर्जत, उरण, श्रीवर्धन, महाड हे ५ मतदारसंघ शिवसेनेला तर पेण व पनवेल हे २ विधानसभा मतदारसंघ भाजपला सोडण्यात आले आहेत. उरण मतदारसंघातून शिवसेनेचे मनोहर भोईर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, असे असताना भाजपचे महेश बालदी यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे उरण मतदारसंघात महायुतीत बिघाडी झाली आहे.
हेही वाचा - 'देशात संकट आल्यावर राहुल गांधी परदेशात पळून जातात'
हेही वाचा - निवडणुकीच्या तोंडावर लहान मुलांचाही जाहीरनामा प्रसिद्ध
महेश बालदी यांच्याशी उमेदवारी मागे घेण्याबाबत बोललो असल्याचे ठाकूर म्हणाले. मात्र, त्यांनी अर्ज मागे घेतला नाही. लवकरच पक्ष नेतृत्वाकडून याबाबत स्पष्टता होईल असे ठाकूर म्हणाले. मात्र, महेश बालदी यांच्या उमेदवारीमुळे महायुतीचे मनोहर भोईर हे अडचणीत सापडले आहेत.