रायगड - 'प्रधानमंत्री मातृवंदना योजने'तील लाभार्थी वाढवण्यासाठी पनवेल महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. 2 डिसेंबर ते 8 डिसेंबर या कालावधीत मातृवंदना सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. मातृ वंदन योजनेत सामील होणाऱ्या महिलांना पाच हजार रुपयांचा लाभ दिला जातो.
पनवेल महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील 87 आशा सेविकांनी आत्तापर्यंत दोन हजार गरोदर महिलांचा शोध घेऊन त्यांना प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ दिला आहे. सर्व उत्पन्न गटातील गरोदर मातांना या योजनेचा लाभ दिला जातो. मात्र, या योजनेबाबत नागरिकांना फारशी माहिती नाही. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.
या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गरोदर महिलांनी पहिल्या शंभर दिवसात पालिका क्षेत्रातील नागरी आरोग्य केंद्रांमध्ये नाव नोंदणी करावी लागते. या योजनेसाठी गरोदर महिलांचे बँकेत बचत खाते असणे आवश्यक आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात एक हजार रुपये, त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱया टप्प्यात दोन हजार रुपये महिलेच्या बचत खात्यावर जमा केले जातात. दुसऱ्या टप्प्यासाठी गरोदर महिलेने सहा महिन्यांच्या आत प्रसूतीपूर्व तपासणी करणे बंधनकारक आहे.
प्रसूतीनंतर बाळाच्या जन्माची नोंद आणि बाळाच्या जन्मानंतर पुढील १४ आठवड्यात बाळाचे सर्व लसीकरण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील दोन हजार रुपये लाभ दिला जातो, अशी माहिती पनवेलचे आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन जाधव यांनी दिली.