रायगड - नवीन वर्षाच्या स्वागताला जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये यासाठी जिल्हा पोलीस दल सज्ज झाले आहे. जिल्ह्यात होणाऱ्या रेव्ह पार्टी आणि अमली पदार्थ तस्करीवर पोलिसांची करडी नजर राहाणार आहे. हॉटेल, रिसॉर्ट, फार्म हाऊस, गच्चीवर सांस्कृतिक कार्यक्रमांवरही बंदी असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलीस सज्ज
नवीन वर्षाच्या स्वागताला रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मुंबई, पुणे, ठाणे शहरातून पर्यटक येत असतात. जिल्ह्यातील महामार्ग आणि अंतर्गत रस्त्यावर पर्यटकांच्या वाहनांची गर्दी होऊन वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे, वाहतूक कोंडीचा त्रास पर्यटकांना सहन करावा लागतो. यासाठी महामार्गावर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वडखळ, पेण, इंदापूर, माणगाव, कशेडी घाट, महाड या मुख्य ठिकाणी वाहतूक कोंडी होत असते. तसेच अलिबाग, श्रीवर्धन, मुरुडकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असल्याने या ठिकाणी पोलीस चेकपोस्ट तयार करण्यात आले आहेत. अशी माहिती अशोक दुधे यांनी दिली.
हेही वाचा - सरसगडावरील कार्यक्रमात नाचवल्या तलवारी, कोरोनाच्या नियमावलीला फाटा
चेकपोस्टवर होणार तपासणी
चेकपोस्ट ठिकाणी आरोग्य कर्मचारीही तैनात करण्यात आले आहेत. येणाऱ्या पर्यटकांची, तसेच वयोवृद्ध नागरिकांची तपासणी चेकपोस्टवर करण्यात येणार आहे. तसेच, अवजड वाहतूक ही पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. जिल्ह्यात पर्यटकांना नव्या वर्षाच्या स्वागतासाठी येण्यास कोणतीच अडचण नाही. मात्र, जिल्ह्यात आल्यानंतर कोरोनाचे नियम पाळणे महत्वाचे आहे.
हॉटेल, रिसॉर्टवर सांस्कृतिक कार्यक्रमास बंदी
नव्या वर्षाच्या स्वागताला हॉटेल व्यावसायिक हे पार्टी, संगीत रजनी असे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करतात. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी आहे. नियमांचे पालन न केल्यास हॉटेल, रिसॉर्टवर कारवाई केली जाईल, असेही दुधे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच, वयोवृद्ध, लहान मुलांना गर्दीच्या ठिकाणी नेणे टाळा, मास्क वापरा, सुरक्षित अंतर पाळा, सॅनिटायझरचा वापर करा, असे आवाहन दुधे यांनी केले.
रेव्ह पार्टी, अमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांवर करडी नजर
नव्या वर्षाच्या अनुषंगाने रेव्ह पार्टी, तसेच अमली पदार्थाची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असते. यादृष्टीने पोलिसांची पथके तयार करण्यात आली आहेत. जिल्ह्यात होणाऱ्या रेव्ह पार्टी, अमली पदार्थ तस्करीवर पोलिसांची करडी नजर राहाणार आहे.
हेही वाचा - माथेरान घाटात बर्निग कारचा थरार