रायगड - पेण तालुक्यातील दादर सागरी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत रावे गावातील गावठी हातभट्टीवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत 1300 लिटर रसायन व दारू बनवण्यासाठी वापरण्यात येणारे ड्रम व इतर साहित्य असा एकूण 64 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट केला आहे. तसेच दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांना गुप्त माहितीदारामार्फत मिळाली माहिती
दादर सागरी पोलिसांना गुप्त माहितीदारामार्फत रावे येथे गावठी हातभट्टीचा धंदा सुरू असल्याची माहिती मिळाली. या माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद पाटील यांनी उपनिरीक्षक के.आर.भऊड, अमर पवार व पोलीस कर्मचाऱ्यांसह गुरुवारी रावे गावातील खाडी भाग येथे छापा टाकला. यावेळी दोन आरोपी हातभट्टी चालवत असल्याचे निर्दशनास आले. तसेच मोठ्या प्रमाणावर दारू बनविण्यासाठी लागणारे रसायन, ड्रम आढळले.
पोलिसांनी सहा हातभट्ट्या केल्या उद्ध्वस्त
या कारवाई दरम्यान, पोलिसांनी एकूण सहा हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या. 1300 लिटर दारू बनविण्यासाठी लागणारे रसायन आणि ड्रम असे 64 हजार रुपयांचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून अधिक तपास दादर सागरी पोलीस करत आहेत.