रायगड - महाड इमारत दुर्घटनेला 36 तास झाले. इमारत कोसळून मातीचा ढिगारा साचलेला, ढिगाऱ्याखाली अडकलेले मृतदेह असा कठीण प्रसंग होता. पोकलन चालक किशोर भागवत लोखंडे या २४ वर्षीय तरुणाने कठीण प्रसंग असताना ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नऊ जणांना काढले आहेत. यामध्ये 8 मृतदेह काढले असून एक चार वर्षीय मोहम्मद बांगी या बालकाला सुखरूप काढण्यात किशोरचा मोलाचा वाटा आहे.
बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील उखंडा लिंबडेवी हे किशोर लोखंडे याचे गाव. किशोर हा मुंबई-गोवा महामार्गाचे रुंदीकरण सुरू असलेल्या कामात एल अँड टी कंपनीच्या पोकलनवर चालक म्हणून काम करीत आहे. पाच वर्षांपासून तो पोकलन चालक म्हणून काम करीत आहे. 24 ऑगस्टला सायंकाळी काजळपुरा येथील तारिक गार्डन ही इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. कंपनीने तातडीने किशोरला पोकलन घेऊन घटनास्थळी पाठविले. त्यानंतर किशोर हा 24 ऑगस्टच्या सायंकाळपासून आतापर्यंत पोकलन चालविण्याचे काम दिवसरात्र करीत आहे.
मातीचा ढिगारा उपसताना खाली अडकलेले व्यक्तींना कोणती इजा होऊ नये याची खबरदारी घेऊन किशोर हा पोकलनमार्फत काम करीत होता. खाण्या-पिण्याची भ्रांत न ठेवता किशोर हा काम करीत आहे. त्याने 36 तासांत 9 जणांना बाहेर काढले असून यामध्ये 8 जण मृतदेह आहेत, तर एका चार वर्षीय मुलाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेला मोहमद बांगी हा जिवंत असल्याचे समजल्यावर त्याच्या बाजूला असलेला ढिगारा सावकाशपणे काढून बाहेर काढण्याचा त्याचा मार्ग किशोर याने मोकळा करून दिला. त्यानंतर या बालकास सुखरूप बाहेर काढण्यात आले.
मोहम्मद बांगी या बालकास काढण्यात प्रशासनाला यश आले असले तरी किशोर लोखंडे याचाही या यशात मोलाचा वाटा आहे. किशोरचे काम हे अहोरात्र सुरू असून चेहऱ्यावर दमल्याच्या छटा दिसत आहेत. मात्र, तरीही मुलाला वाचविल्याचे समाधान किशोरच्या चेहऱ्यावर खुलून दिसत आहे.